चिमुरड्यांची काळजी घेण्याची आवश्यकता

१ जून पासून नवीन कोव्हीड बाधितांची दैनंदिन वाढती संख्या लक्षात घेऊन कोविड संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन, महापालिका प्रशासन प्रयत्न करीत असतानाच गेल्या दहा महिन्यात महाराष्ट्र राज्यातील १ लाख ४२ हजार लहान मुले-मुलींना ‘कोरोना'ची बाधा झाल्याची आकडेवारी समोर आल्याने लहान मुले-मुलींना कोविड आजाराचा धोका कमी आहे, असा समज असलेल्या पालकांनी लहानग्यांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील दहा वर्षाच्या आतील कोविड बाधित मुले-मुलींचे प्रमाण ३.१९ टक्क्यांवर तर ११ ते २० वयोगटातील मुले-मुलींचे कोविड बाधित होण्याचे प्रमाण ७.४३ टक्वयांवर पोहोचल्याने आरोग्य तज्ञांकडून भीती व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत प्रौढांमध्ये ‘कोविड'चे प्रमाण अधिक असून, लहान मुले-मुलींना ‘कोविड'चा धोका कमी असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञ व्यक्त करत होते. परंतु, आरोग्य तज्ज्ञांच्या मत चुकीचे ठरले असल्याचे महाराष्ट्र राज्यातील १ लाख ४२ हजार लहान मुले-मुलींना ‘कोरोना'ची बाधा झाल्याने स्पष्ट झाले आहे. सध्या महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांमध्ये कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमध्ये लहान मुले-मुलींचे प्रमाणही वाढत असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडणे साहजिकच आहे. राज्यात फेब्रुवारी २०२१ पर्यंत ७० हजार ४५९ लहान मुले-मुली कोरोनाबाधित झाली आहेत. त्यानंतर केवळ दहा महिन्यात १ लाख ४२ हजार ३२९ लहान मुले-मुली कोरोना आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. राज्यभरात दहा वर्षाच्या आतील २ लाख १२ हजार ७८८ लहान मुले-मुली आत्तापर्यंत बाधित झाली असून, त्यांचे प्रमाण ३.१९ टक्के इतके आहे. ‘कोरोना'च्या सुरुवातीच्या काळात लहान मुले-मुलींचे कोविड बाधित होण्याचे प्रमाण तुरळक होते. जून-जुलै महिन्यात ‘कोरोना'चा कहर सुरु असताना लहान मुले-मुलींचे बाधित होण्याचे प्रमाण नियंत्रणात होते. जुलै-२०२० मध्ये राज्यात केवळ ९१२१ लहान मुले-मुलींना ‘कोरोना'ची बाधा झाली होती. सदर प्रमाण एकूण कोविड रुग्णांच्या ३.७२ टक्के इतके होते तर राज्यातील एकूण कोविड रुग्ण संख्या २ लाख ५४ हजार ४३७ इतकी होती. सुरुवातीचे सहा महिने लहान मुले-मुलींमधील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजाराच्या आत होती. पण, वर्षभरात कोविड बाधित लहान मुले-मुलींची संख्या झपाट्याने वाढली. लहान मुले-मुलींमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती अधिक असल्याने त्यांना ‘कोरोना'ची गंभीर लक्षणे जाणवत नाहीत. मात्र, गंभीर आजार असलेल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. एकूणच पालकांनी कोरोना नियमांचे पालन करुन लहान मुले-मुलींना ‘कोविड'ची लागण होणार नाही, याची दक्षता घेण्याची नितांत आवश्यकता आहे. याशिवाय लहान मुले-मुलींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न सरकारने करण्याची देखील गरज आहे. पालकांनी दक्षता घेतली तर लहान मुले-मुलींना ‘कोविड'चा संसर्ग होणार नाही. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 ‘मृत्यु'चा रस्ता