स्वागतार्ह कारवाई

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी रस्ते अपघातात वाढ होत असून, या अपघातात हजारो नागरीकांचा मृत्यू होत आहे. या अपघातात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांचा जास्त समावेश आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करुनच प्रवास करावा, असा नियम  असून देखील आजही दुचाकीस्वार विना हेल्मेट रस्त्यावरुन सुसाट वेगाने वाहने चालवित स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे वाशी आरटीओ कार्यालयाने आता महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा घतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या कारवाईची सुरुवात शासकीय कार्यालयांपासून करण्याचा वाशी आरटीओ कार्यालयाचा निर्णयही प्रशसंनीय आहे. नवी मुंबई शहरात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्याबरोबरच नवी मुंबई मध्ये वाहने देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, वाढत्या वाहनांबरोबर नवी मुंबई शहरात वाहतूक नियम तोडणाऱ्या चालकांची संख्या देखील वाढत चालली आहे. दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांच्या संख्येत वाढ होत असून, त्यातील बहुतांश अपघात दुचाकीस्वारांचे आहेत. या अपघातात हेल्मेट न घातल्याने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हेल्मेट सक्तीचे आदेश असताना देखील आजही नियम धुडकावून दुचाकी वाहन चालक विना हेल्मेट प्रवास करत असतात. यंदाही नवी मुंबई शहरात अपघातात दुचाकीस्वारांचे अपघात वाढले असून, विशेषतः विना हेल्मेट असल्याने दुचाकीस्वारांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात २०२० या वर्षीच्या तुलनेत २०२१ मध्ये अधिक रस्ते अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही राज्यातील रस्ते अपघातांची संख्या २४ हजार ९७१ इतकी होती. या अपघातांमध्ये ११ हजार ५६९ नागरिकांना प्राणांना मुकावे लागले तर १३ हजार ९७१ लोक गंभीर जखमी झाले होते. याउलट २०२१ मधील जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अपघातांमध्ये २६ हजार २८४ र्पयंत वाढ झाली आहे. याशिवाय संबंधित रस्ते अपघातांमध्ये ११ हजार ९६० प्रवाशांचा हकनाक जीव गेला असून, १४ हजार २६६ लोक गंभीर जखमी झाले आहेत. या रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे वाशी आरटीओ कार्यालयाद्वारे आता विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे उचललेले पाऊल विना हेल्मेट रस्त्यावर दुचाकी चालविणाऱ्यांना बेलगाम दुचाकीस्वारांना लगाम लावणारे आहे. दिवसेंदिवस दुचाकी विशेषतः विना हेल्मेट दुचाकीस्वारांचे अपघात वाढत आहेत. त्यामुळे  विना हेल्मेट दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा वाशी आरटीओ कार्यालयाचा निर्णय योग्यच आहे. अर्थात यापुढेही विना हेल्मेट दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम वाशी आरटीओ कार्यालयाने नियमितपणे सुरु ठेवण्याची गरज आहे. दंडात्मक कारवाईमध्ये सातत्य राहिले तरच विना हेल्मेट दुचाकीस्वारांना जरब वाटणार आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केवळ काही दिवसच केली गेली तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 ‘र्निबंधमुक्ती’ची गुढी