उष्णतेची ही लाट धोकादायक

देशात नुकताच पार पडलेल्या पाच राज्यांतील निवडणूकांंंपैकी चार राज्यांत भाजपने बाजी मारली असल्याने भाजपची लाट कायम असल्याचे बोलले जात असून मोदींचा करिश्मा अद्यापही कायम असल्याने ही २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकांची चूणूक असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. देशात अशा लाटा येत आणि जात असतात. काही जण त्यांना लाट नव्हे, तर केवळ उसळी म्हणा असे सांगत त्यांची तीव्रता घटवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण मात्र त्या राजकीय लाटेविषयी नव्हे; तर उष्णतेच्या लाटेविषयी विचार करायला हवा. कारण गेले काही दिवस उष्णतामानाने उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. १२ व १३ मार्च रोजी तर नवी मुंबईचे तापमान ४० अंश सेल्सियस इतके नाेंदले गेले होते. सर्वसाधारणपणे एप्रिल व मे महिने हे अत्यंत कडक उन्हाळ्याचे मानले जातात. पण अलिकडे निसर्गाने आपले वेळापत्रक पूर्णतः बदलले असून वर्षाच्या कोणत्याही महिन्यात पाऊस पडू लागल्याचे प्रत्ययास येते. तसेच होळीपूर्वीच प्रचंड उष्म्यास सुरुवात झालेलीही हल्ली पहायला मिळत आहे. नवी मुंबई हे महानगर मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी वसवले गेले असल्याने येथे लोकसंख्या वाढती राहील हे स्पष्टच आहे. त्यामुळे नवी मुंबईत निवासी बांधकामे स्वाभाविकपणे पुष्कळच! पण याच्या जोडीला नवी मुंबईसह उरण व पनवेल हा सारा परिसरच महाप्रकल्पांचा बनत गेल्याने अन्य व्यावसायिक बांधकामे व त्यांना अनुसरुन टोलेजंग इमारतीही या भागात उभारल्या गेल्या. सिमेंट काँक्रिटचे जंगलच बनत चालल्याने त्या साऱ्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून या परिसराचे उष्णतामान वाढत जाणे हे स्वाभाविकच होते. नाही म्हणायला सिडको व त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका यांच्या नियोजनकत्यांनी येथे बऱ्यापैकी जंगलसंपत्तीही वाढत राहील, आहे तिचे जतन केले जाईल, नव्याने कक्षारोपणे केली जाऊन त्या कक्षांची निगा राखली जाईल याची काळजी घतल्याने या सर्व परिसरात बऱ्यापैकी हिरवाई दिसून येते. मात्र अजूनही नवी मुंबई, पनवेल, उरण या भागात असलेल्या डाेंगर टेकड्यांवर काही असामाजिक तत्वांकडून आगी लावल्या जाऊन ते वणवे आहेत असे भासवले जाते. यात बहुमोल अशा निसर्गसंपदेचे नुकसान होत असते. उष्णतेची धोकादायक लाट वाढवण्यास असे वणवे कारणीभूत ठरतात. त्याशिवाय या भागातील श्रीमंती वस्त्यांमधील वातानुकुलन यंत्रणा, इमारतींवर लावलेल्या काचा, रिपलेक्टर्स, बंदिस्त गटारांमध्ये तयार होणारा धोकादायक वायु, प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या वाहतूकीमुळे त्यांच्या इंधनाने होणारे कार्बन उत्सर्जन हे व असे विविध घटक एकूणच उष्णतामान वाढण्यास हातभार लावत असतात. वाढते उष्णतामान हे विविध रोगांनाही आमंत्रण देणारे ठरु शकते. मार्च महिन्याच्या पूर्वार्धात पारा चाळीस अंशावर पोहचला तर मे महिन्याच्या मध्यावर काय होईल, याची साधार भिती वाटते. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 स्वागतार्ह कारवाई