जलद नि महाग नव्हे, परवडणारा प्रवास हवा

मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी खाडीपुलाकडे एक सुनियोजित महानगर वसवण्याची कल्पना सत्तरच्या दशकात पुढे आली आली आणि पुढे जाऊन तेच महानगर भारतातील एक सुंदर व स्वच्छ शहर म्हणून नावारुपाला आले. त्याचे नाव नवी मुंबई. त्या शहरालाही आला चाळीस वर्षाहून अधिक काळ लोटल्याने त्याच्या काही प्रश्नांनी गंभीर स्वरुप धारण करायला सुरुवात केली आहे. त्यातील प्रमुख होता प्रदूषणाचा प्रश्न! पण एकेकाळच्या ठाणे-बेलापूर पट्टी या आशियाखंडातील सर्वात मोठ्या कारखानदारी पट्टयातील अनेक कारखाने येथून स्थलांतरीत झाले आणि येथील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि मोकळे श्वास घ्यायला सुरुवात केल्याला पुरेसा कालवधी लोटला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोरबे धरण येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीचे झाल्याने सुटला. आजमितीस या महानगराला भेडसावणारा प्रमुख प्रश्न म्हणजे वाहतुक खोळंब्याचा होय. मुंबई महानगर चोहाेंबाजूंनी वाढत गेले, ठाण्याची लोकसंख्या व वाहन संख्या बेसुमार वाढली आणि स्वस्त घरांच्या लोभाने अनेक लोक पनवेलकडे सरकले. यामुळे नवी मुंबईमधील दळणवळणाच्या मार्गांवर या साऱ्याचा अपरिहार्य ताण येणे स्वाभाविक होते. रस्ता व रेल्वे यावरील बोजा कमी करण्यासाठी मुंबई ते नवी मुंबई अशा जलवाहतुकीबाबत वारंवार बोलले आणि सांगितले जात आहे. तो जलप्रवास आज दि.१७ फेब्रूवारीपासून सुरु होत आहे. हे अंतर केवळ ३५ मिनिटांत कापणे शक्य असल्याचे सांगितले जात असतानाच या एवढ्या कमी अवधीच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती ७०० ते १२०० रुपये एका फेरीसाठी आकारले जाणार असल्याची माहिती मिळते. चालवल्या जाणाऱ्या वॉटर टॅक्सी या दिवसाला १२-१२ फेऱ्या मारतील आणि मुख्य म्हणजे पावसाळ्यातही त्या सुरुच असतील. यामुळे मुंबई-नवी मुंबईच्या रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी होईल. पण एका फेरीसाठी एवढे पैसे परवडतील कुणाला? ७०० रुपयांत मध्यमवर्गीयांचा याहुन लांबच्या प्रवासाचा रेल्वेचा महिन्याचा पास निघतो. ते लोक वॉटर टॅक्सीच्या नादाला लागण्याची शक्यता कमीच! मग याचा वापर कोण करणार? तर मुठभर श्रीमंत लोकच!म्हणजे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांतून उभारण्यात आलेली ही जलवाहतूक सर्वसामान्यांच्या काहीच कामाची नाही. तीच बाब मध्य व हार्बर मार्गावरील वातानुकुलित लोकल फेऱ्यांची. वास्तविक पाहता या लोकलफेऱ्यांची कुणीही मागणी केली नाही, की त्यासाठी कोणतीही आंदोलने झाली नाहीत. तरीही मध्य-हार्बर मार्गावर ही महागडी सेवा इतर सामान्य गाड्यांमध्ये कपात करुन चालवली जात आहे. आता १८ तारखेपासून ३६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. त्यात ३४ वातानुलित गाड्यांची भर पडणार आहे. त्यांना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद ध्यानात घऊनही ! हे कुणाच्या अट्टाहासाखातर केले जात आहे? जनसामान्यांना जलद व स्वस्त प्रवास हवा आहे. थंड, जलद नि महाग नको ! 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 बेकायदा बांधकामे; संकटाला आमंत्रण