जलसाक्षरतेची गरज

नवी मुंबई शहरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करत असल्याचा दावा, स्वतःच्या मालकीचे धरण असलेले नवी मुंबई महापालिका प्रशासन जरी छातीठोकपणे करीत असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. नवी मुंबई मधील अनेक भागात आजही सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. पाणी पुरवठा खंडित झाल्यावर नवी मुंबई मधील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यामुळे पाणी बचत किती आवश्यक आहे, याची जाणिव आता नवी मुंबईकरांना होत आहे. पाण्यामुळेच मानवी संस्कृती अधिक समृध्द आणि संपन्न झाली आहे. पाणी आणि मानवी जीवन यांचा अतूट सांधा संस्कृती संवर्धक म्हणून सन्मानित झालेला वारसा आहे. त्यामुळे मानवी जीवनात पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.  निसर्गाचा लहरीपणा, काही ठिकाणी अति पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळाची दाहकता अशा विचित्र परिस्थितीमध्ये पाण्याची बचत करून भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व स्तरावरील व्यक्तींनी सर्वकाळ प्रयत्न केले तरच पाण्याच्या भीषण टंचाईवर मात करणे शक्य होणार असल्याची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवण्याची गरज आहे. पाणी जीवन, अमृत आहे. तसेच पाणी धरतीचा आत्मा आहे. पाण्यामुळेच राष्ट्राची प्रगती होणार आहे. जीवसृष्टीची उत्पत्ती देखील पाण्याने होत असल्याने पाण्याचे रक्षण करणे, जतन करणे, संवर्धन करणे, पुनर्भरण करणे आणि पाणी स्वच्छ, शुध्द ठेवणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. पाणी द्रव, वायू अथवा घन असे कोणत्याही रुपात असले तरी पाणी एक महाशक्ती आहे. त्यामुळेच भविष्य सुरक्षित आणि समृध्द करण्यासाठी जल संपत्तीच्या संवर्धनाकरिता जाणीवपूर्वक कृतीशील प्रयत्न करण्याची तसेच पाण्याविषयी आदराची भावना प्रत्येकानेच जोपासण्याची आवश्यकता आहे. खरे म्हणजे जलसाक्षर समाजच पाण्याच्या बचतीसाठी पुढाकार घणार आहे. खरेतर जलसाक्षरता केवळ व्यक्तीची अथवा विभागाची मर्यादित न राहता देशातील प्रत्येक राष्ट्रप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी माणसांची जीवनशैलीच असण्याची गरज आहे. केवळ पाण्याचा अतिवापर टाळा, पाणी काटकसरीने वापर असा संदेश करुन उपयोग नाही तर तापमान वाढीच्या झळांपासून संरक्षणासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविणे आवश्यक आहे. पाणी दूषित होणार नाही याची काळजी घण्याची तसेच पाणी वाचविण्याचे सर्व उपाय स्वतःपासून सुरु होतात याची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवण्याची गरज आहे. वापरलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाला कष्ट, किंमत लागते, इतके लक्षात ठेवून प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरल्यास आणि पाणी वाचविण्याची सवय लावल्यास फार मोठा बदल होऊ शकतो. जलचक्रानुसार पाणी मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आकाशातून पडणारा पाऊस. त्यामुळेच भविष्याच्या सुरक्षिततेसाठी पावसाचे पाणी साठविणे, पर्जन्यजलाचा साठा करुन त्याचा पुर्नवापर करणे, पाऊस मुबलक असताना जलसंचय करुन पाऊस नसताना उपलब्ध पाण्याचा वापर करणे आता काळाची गरज आहे. जलसाक्षरतेची चळवळ जनमानसात रुजविण्यासाठी शासनाने काही कडक नियम देखील बनवण्याची गरज आहे.महाराष्ट्र राज्यासह देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी, देशातील नद्या बारमाही वाहत्या राहण्यासाठी जलसाक्षरतेची चळवळ अधिक व्यापक होण्यातच प्रत्येक व्यक्ती, समाजाचे आणि देशाचे हित आहे. जलसाक्षरता चळवळ म्हणजे देश कार्य समजून तरुणाईने नेटाने वाटचाल केल्यास पाणीटंचाई कायमची नष्ट होऊन समृध्दीची पहाट आल्याशिवाय राहणार नाही. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

जलद नि महाग नव्हे, परवडणारा प्रवास हवा