‘बेपत्तां’ची धक्कादायी सांख्यिकी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतून जानेवारी-२०१७ पासून जुलै-२०२१ या साडेचार वर्षाच्या कालावधीत एकूण ७७९१ व्यक्ती बेपत्ता झाल्याची समोर आलेली आकडेवारी समाजासाठी निश्चितच चिंताजनक आहे.  मुले-मुली, महिला-पुरुष कोणत्याही कारणांनी घराबाहेर पडून पुन्हा घरी परत आले नाहीत तर त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होणे स्वाभाविकच आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त ४०८१ महिला बेपत्ता झाल्याची नाेंद असून, ३३०७ पुरुष बेपत्ता झाले आहेत. याशिवाय २१० मुले आणि १९३ मुली देखील बेपत्ता झाल्या आहेत. दुसरीकडे २०१७ पासून आतार्पयंत बेपत्ता झालेल्या एकूण महिलांपैकी ३५६५ महिला आणि २८१३ पुरुष सापडले आहेत. तर १८८ मुले आणि १७० मुलींचा देखील शोध लागला आहे. आकडेवारीनुसार गेल्या साडेचार वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतून बेपत्ता झालेल्या ५१६ महिला, ४९४ पुरुष, २२ मुले आणि २३ मुली अशा एकूण १०५५ व्यक्तींचा न लागलेला शोध अतिशय गंभीर बाब आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये पुरुषांची संख्या कमी तर तरुण, तरुणी आणि महिलांची संख्या जास्त आहे. बहुतांश तरुणी या युवकांच्या प्रेमात पडून आई-वडिलांचे घर सोडून बाहेर पडत आहेत. मात्र, प्रियकाराकडून धोका मिळाल्यानंतर घरी परत जाणे कठीण होऊन बसलेल्या अनेक तरुणी दूरवर निघून जात असल्याचे वास्तव पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. तर विवाहित महिला कौटुंबिक कलहातून घर सोडत असल्याची अनेक प्रकरणे पोलीस तपासात समोर आली आहेत. परंतु, एकदा का विवाहितेला तिची चुक लक्षात आली की, ती घरी परत आल्याची देखील असंख्य प्रकरणे आहेत. काही तरुणी देखील प्रेमप्रकरणातून घरातून निघून गेल्याचे निदर्शनास आले आहे. घरातील कोणाचा तरी राग आला, परीक्षेत कमी गुण मिळाले तर घरी सांगितल्यावर काय होईल, या भितीने अनेक लहान मुले-मुली घर सोडून जात आहेत. असंख्य मुले-मुली रेल्वे स्थानकावर आणि शहरात आजही भटकत असल्याचे दुदैर्वी चित्र दिसते. संकटात सापडलेल्या लहान मुलांसाठी कार्यरत असलेल्या चाईल्ड लाईन या संस्थेच्या कार्यकत्र्यांना भटकलेली मुले रेल्वे स्थानक आणि बस स्थानक परिसरात नियमित सापडत असतात. ‘चाईल्ड लाईन’च्या कार्यकत्र्यांकडून भटकलेल्या मुले-मुलींचे समुपदेशन करुन त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था केली जाते. बेपत्ता मुले-मुलींचा शोध घण्यासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान’ नामक विशेष मोहिम राबविण्यात येते. या मोहिमेमुळे अनेक वर्षापासून कुटुंबियांपासून दुरावलेली मुले-मुली पोलिसांच्या हाती लागली आहेत. कौटुंबिक वादातून अथवा अन्य कौटुंबिक कारणांमुळे घरातून निघून जाणाऱ्या १५ ते १७ वयोगटातील मुले-मुलींचे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता होणाऱ्या मुले-मुलींच्या शोधासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न नेहमीच केले जात असले आणि बेपत्ता होणाऱ्यांचा शोध घण्यात पोलिसांना यश येत असले तरी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतून जानेवारी-२०१७ पासून जुलै-२०२१ र्पयंत बेपत्ता झालेल्या व्यक्तींची आकडेवारी समाजासाठी निश्चितच धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

जलसाक्षरतेची गरज