मुली-महिला असुरक्षित 

 
सन -२०२१ या वर्षभरात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत मुली-महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्द मुली-महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समाजासमोर आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत २०२० या वर्षाच्या तुलनेत २०२१ या वर्षात बलात्कार अणि विनयभंगासह मुली-महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. २०२१ या वर्षामध्ये महिलांशी संबंधित बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, छळवणूक तसेच छेडछाडीचे असे तब्बल ६५८ गुन्हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दाखल झाले आहेत. त्यामुळे महिलांसाठी नवी मुंबई किती सुरक्षित आहे, यावर सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सन-२०२० मध्ये बलात्काराच्या १२७ घटना घडल्या असून, त्यापैकी १२६ गुन्हे उघडकीस आले आहेत. परंतु, २०२१ या  वर्षामध्ये नवी मुंबई मध्ये २१२ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे (पोक्सो) सुमारे ८५ गुन्हे दाखल आहेत. यातील २११ गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. २०२० या वर्षीच्या तुलनेत २०२१ या वर्षामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये ८५ गुन्ह्यानी वाढ झाली आहे. यात लग्नाचे आमिष दाखवून, नोकरीचे आमिष दाखवून, शेजाऱ्यांकडून, नातेवाईकांकडून, मित्र-ओळख करुन मैत्री करुन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यापैकी सर्वात जास्त बलात्काराच्या घटना या ओळखीच्या व्यक्तीकडून झाल्याचे स्प्ष्ट झाले आहे. महिला-मुलींवरील बलात्काराचा घटनांबरोबरच महिलांवरील विनयभंगाच्या गुन्ह्यात देखील वाढ होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत २०२० मध्ये १९८ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले असून, त्यातील १८७ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर २०२१ मध्ये २१४ विनयभंगाचे गुन्हे घडले असून, त्यापैकी २०५ गुन्हे उघडकीस आले आहेत. या आकडेवारीवरुन विनयभंगाच्या गुन्ह्यात देखील वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत २०२० या वर्षी मुली-महिलांच्या छेडछाडीचे २४ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी २१ गुन्हे उघडकीस आले होते. तर २०२१ मध्ये महिलांच्या छेडछाडीचे २६ गुन्हे दाखल असून, यातील २२ गुन्हे उघडकीस आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत २०२० या वर्षामध्ये हुंडाबळीचे १४ गुन्हे दाखल झाले असून, २०२१ वर्षात १५ गुन्हे घडल्याची नाेंद आहे. २०२० या वर्षात महिलच्या छळवणुकीचे (४९८ए नुसार) ९४ गुन्हे दाखल झाले होते. मात्र, २०२१ या वर्षामध्ये छळवणुकीचे १९० गुन्हे दाखल झाले आहेत. यावरुन महिलावरील कौटुंबिक हिंसाचाऱ्यांच्या (छळवणूक) घटनांमध्ये देखील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले. ‘कोरोना’मुळे लागे लॉकडाऊन काळात अनेक कुटुंबात पती-पत्नीमधील वाद टोकाला गेल्याने महिलांकडून कौटुंबिक छळाच्या तक्रारीत वाढ झाली. कौटुंबिक छळवणुकीच्या तक्रारीच्या संख्येत वाढ होत असल्याने देखील एकूणच समाजाने चिंता व्यक्त करण्याची गरज आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 ‘बेपत्तां’ची धक्कादायी सांख्यिकी