नवी मुंबईतील वाहनांना वाशी, ऐरोली टोल माफ करण्याची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबईतील (श्प्४३) वाहनांना वाशी आणि ऐरोली टोलनाक्यावर टोल माफी देण्यात यावी, अशी मागणी ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात गेल्या ६ वर्षांपासून आपण पाठपुरावा करीत असून २०१८ रोजीच्या हिवाळी अधिवेशनामध्येही विधानसभेमध्ये टोलमाफीची मागणी करण्यात आली होती.

त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.. एकनाथ शिंदे यांना संपर्क साधल्यावर त्यांनीही याबाबत सकारात्मक चचेअंती लवकरच कार्यवाही करण्याचे संकेत दिले होते, असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. नवी मुंबई शहर मुंबईला लागूनच असल्याने आणि नवी मुंबईतील बहुतांश वाहने दररोजच मुंबईला ये-जा करीत असल्याने नवी मुंबई पासिंग असलेल्या (श्प्४३) वाहनांना वाशी आणि ऐरोली येथील टोल माफ करावा, याकरिता मी गेली ६ वर्षे मागणी करीत आहे. २०१८ रोजीच्या हिवाळी अधिवेशनातही मी औचित्याच्या मुद्द्यावर सभागृहात सदरचा विषय मांडला होता. परंतु, अजुनही याबाबत कार्यवाही न झाल्याने नवी मुंबईकरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वाशी आणि ऐरोली येथे टोल नाका तयार झाल्यापासून नवी मुंबईतील नागरिक टोल भरणा करीत आहेत. सदर टोल वसुलीचा कार्यकाळ संपून अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. तसेच रस्त्याच्या उभारणी आणि देखभालीचा खर्चही वसूल झाला असताना टोल वसुली मात्र सुरुच आहे, असे आ. म्हात्रे म्हणाल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्याने आणि काहींचे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यासमोर बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असताना किमान नवी मुंबईतील वाहनांना टोल माफ करण्यास काही हरकत नाही. वाशी आणि ऐरोली येथील टोल नाक्यावर नवी मुंबईतील वाहनांना टोल माफ केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील वाहनांना वाशी आणि ऐरोली येथील टोल माफ करण्याची मागणी करणारे निवेदन दिल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

वाशी पादचारी पूल रद्द न केल्यास आंदोलन - नवी मुंबई कोंग्रेस चे प्रवक्ता वैभव सावंत