बेफाम मोटार सायकलस्वारांना चाप

कोणत्याही रस्त्यावर दुचाकी चालविताना डोक्यावर हेल्मेट घालेण दुचाकीस्वारांच्या आरोग्यासाठी हिताचेच आहे. हेल्मेटमुळे चुकुन दुचाकीचा अपघात झाला तर त्या अपघातातून दुचाकीस्वाराचे डोके हमखास बचावते. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी डोक्यावर हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या आणि दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीविरुध्द मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार कारवाई करण्याची सुरु केलेली मोहीम स्वागतार्ह आहे. अर्थात दुचाकी चालविताना चालकाला डोक्यावर हेल्मेट घालणे बंधनकारक करताना दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीनेही डोक्यावर हेल्मेट घालणे अनिवार्य करणे कितपत योग्य आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतुक) पुरुषोत्तम कराड यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विना हेल्मेट दुचाकी गाडी चालविणाऱ्या चालकांवर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तींविरुध्द धडक कारवाई करण्यास २९ ऑक्टोबर २०२१ पासून सुरुवात केल्याने डोक्यावर हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तींना चांगलाच लगाम बसणार आहे. वाहतुक पोलिसांच्या र्निबंधांमुळे आता विना हेल्मेट दुचाकीवर पाठीमागे बसणे महागात पडणार आहे. नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत विशेष मोहिमेद्वारे विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करुन विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहन चालकांना चांगलाच चाप लावला आहे. विशेष मोहिम दरम्यान विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तींवर देखील वाहतुक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याने विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसायचे की नाही?, याचा प्रत्येक व्यक्तीला विचार करावा लागणार आहे.  नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमधील २० पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये तसेच या अपघातांतील मृतांमध्ये वाढ होत आहे. यातील बहुतांश अपघात दुचाकी चालकाने डोक्यावर हेल्मेट न घातल्यामुळे झाल्याचे वाहुतक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुचाकीस्वाराने डोक्यावर हेल्मेट घालणे गरजेचे झाले आहे. मात्र, अनेक दुचाकी चालक डोक्यावर हेल्मेट घालत न घालताच दुचाकी चालवून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे नवी मुंबई वाहतुक पोलीस शाखेने विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर २९ ऑक्टोबर २०२१ पासून दंडात्मक कारवाई करण्याची सुरु केलेली विशेष मोहिम दुचाकीस्वारांच्या आरोग्यासाठी हिताचीच आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

स्वागतार्ह कारवाई