खोटे दस्ताऐवजाद्वारे वक्फ बोर्डाची व सिडकोची फसवणूक करणाऱयांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई : खैरणे गाव येथील कब्रस्तानासाठी आरक्षित असलेली ३० गुंठे जमीन हडप करण्यासाठी काही व्यक्तींनी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे खोटे दस्तऐवज सादर केल्याची तक्रार सदर कब्रस्तानाचे व्यवस्थापन पाहणाऱया ट्रस्टने महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे तसेच कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी १९ व्यक्तींविरोधात बनावट कागदपत्रे तयार करुन वक्फ बोर्डाची व सुन्नी कोकणी मुस्लीम कब्रस्तान ट्रस्टची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   

खैरणे गाव येथे असलेल्या कब्रस्तानच्या जमिनीपैकी सर्वे नं. १९०/१ हि जमिन पुर्वी बद्रुद्दीन पटेल यांच्या नावे होती. त्यांच्या मृत्युनंतर १९५२ मध्ये सदरची जमिन हि वारसा हक्काने त्यांची मुले अहमद पटेल, युसूफ पटेल व लतीफ पटेल यांच्या नावाने झाली होती. सर्वे क्र. १९०/१ मध्ये एकुण ५१ गुंठे जमिन असून सदर जमीन १९७० मध्ये सिडकोने संपादित केल्यानंतर १९८२ मध्ये सिडकोने त्यातील ३० गुंठे जागा हि मुस्लीम कब्रस्तानासाठी आरक्षित केली. त्यानंतर सिडकोने १९९२ मध्ये अहमद पटेल, युसूफ पटेल व लतीफ पटेल यांना ५१ गुंठे जमीनपैकी ३१ गुंठे जमिनीचे पैसे दिले व उर्वरित २० गुंठे जमिनीवर पुर्वीपासूनच कब्रस्तान असल्यामुळे त्याचे पैसे सरकारजमा केले. त्यानंतर सिडकोने पटेल कुटुंबाला १९९९ मध्ये संपादित केलेल्या ५१ गुंठे जमिनीचा साडेबारा टक्के योजनेअंतर्गत सेक्टर-१२बी मध्ये भूखंडाच्या स्वरुपात मोबदला देखील दिला. 

दरम्यान, खैरणे गावातील ग्रामस्थांनी २०१८ मध्ये ३० गुंठे जमिनीवर असलेल्या कब्रस्तानाची देखरेख व व्यवस्थापन करण्यासाठी सुन्नी कोकणी मुस्लीम कब्रस्तान ट्रस्टची स्थापना करुन त्याची रितसर महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली आहे. तेव्हा पासून सदरची जमिन हि सुन्नी कोकणी मुस्लीम कब्रस्तान ट्रस्ट येथील कब्रस्तानाचे अधिकृतरित्या नियमन व देखरेख करत आहे. तसेच कब्रस्तानमध्ये दफन करण्यात येणाऱया नागरिकांचे मृत्यु प्रमाणपत्र देखील याच ट्रस्टकडून देण्यात येत आहे.  

दुसरीकडे, मृत बद्रुद्दीन पटेल व त्यांच्या वारसदारांनी सर्वे नं. १९०/१ या जमिनीचे मालक असल्याचे तसेच सदरची जमिन त्यांच्या ताब्यात असल्याची खोटी माहिती वक्फ बोर्डाला दिली. तसेच सिडकोने आरक्षित केलेल्या जमिनीवरिल कब्रस्तानचे नियमन व देखरेख करण्यासाठी बद्रुद्दीन पटेल सुन्नी मुस्लीम कब्रस्तान या नावाने व्यवस्थापकीय समितीची नोंदणी करण्यासाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये वक्फ बोर्डाकडे वक्फ डिड, शपथपत्र आदी कागदपत्रे सादर केली.  

सुन्नी कोकणी मुस्लीम कब्रस्तान ट्रस्टकडून कब्रस्तानाचे व्यवस्थापन करण्यात येत असताना, त्याच कब्रस्तानावर मुळ जमीन मालकांनी दावा केल्याने गत डिसेंबर महिन्यामध्ये औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ ट्रिब्युनलने सदर सुन्नी कोकणी मुस्लीम कब्रस्तान ट्रस्टला नोटीस पाठवून त्यावर त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एपीएमसीत सुरक्षित अंतराचा फज्जा