मुख्यमंत्र्याविरोधात सोशल मिडीयावर पोस्ट टाकणा-या भाजपाच्या माजी नगसेविकेच्या पतीला अटक

नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोसह त्यांची बदनामी करणारी पोस्ट, सोशल मिडीयावर टाकणे कोपरखैरणेतील भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती संदिप म्हात्रे याला चांगलेच महागात पडले आहे. संदिप म्हात्रे याने महाराष्ट्र व कार्नाटक राज्यातील जनतेमध्ये तेढ व शत्रुत्वाच्या भावना वाढविणारी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणारी पोष्ट टाकुन शिवसैनिकांच्या भावना भडकविल्याने कोपरखैरणे  पोलिसांनी म्हात्रे यांना अटक करुन त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.  

संदिप म्हात्रे हे कोपरखैरणे सेक्टर-6 मध्ये रहाण्यास असून ते भाजपाचे सक्रिय  कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी गीता म्हात्रे या कोपखैरणे भागात नगरसेविका होत्या. कोपरखैरणेतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य असलेल्या ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ या व्हॉट्सऍप ग्रुप वर संदिप म्हात्रे हे देखील आहेत. गुरुवारी दुपारी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोसह त्यांची बदनामी करणारी पोस्ट ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ या व्हॉट्सऍप ग्रुपवर टाकली होती. ही पोस्ट सदर ग्रुपवर असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱयांच्या निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेचे नवी मुंबई उप जिल्हा प्रमुख मनोहर मढवी, ऐरोली विधानसभा मतदार संघाचे शहर प्रमुख प्रविण म्हात्रे, ऐरोली विधानसभा मतदार संघाचे उपशहर प्रमुख विनयानंद माने, प्रमुख गोपिनाथ आगास्कर, डी.आर.पाटील, सुरेश सकपाळ व इतर पदाधिकाऱयांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून  तक्रार दाखल केली.  

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील व त्यांची बदनामी करणारी पोष्ट टाकुन शिवसैनिकांच्या भावना भडकविणाऱया तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील जनतेमध्ये तेढ व शत्रुत्वाच्या भावना वाढविणाऱया संदिप म्हात्रे याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी संदिप म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला शुक्रवारी अटक केली आहे. त्यानंतर दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची १ दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील  शेळके यांनी दिली. 

दरम्यान, संदिप मात्रे यांनी सुर्या नामक व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेला मजकूर कोपरखैरणेतील व्हॉट्सऍप ग्रुपवर टाकल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे पोलिसांनी ट्विटरवरुन सदरची पोस्ट टाकणाऱया सुर्या नामक व्यक्तीवर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

खोटे दस्ताऐवजाद्वारे वक्फ बोर्डाची व सिडकोची फसवणूक करणाऱयांविरोधात गुन्हा दाखल