नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची बदली 

नवी मुंबई : संपूर्ण राज्यासह नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोना संसर्गाचा वेग वाढत असताना राज्य शासन मात्र अधिकाऱ्यांच्या बदली मध्ये मश्गुल असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने नवी मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची बिन मौसमी बदली करून,  नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई चे उपायुक्त  मंगेश चितळे यांची नियुक्ती केली आहे. 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बदली साठी पोलीस विभागातील अधिकाऱ्यांमध्ये जशी चढाओढ सुरू असते, त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेत आपली वर्णी लावुन घेण्यासाठी काही अधिकारी मंत्रालयात साम, दाम , दंडाचा वापर करून आपला वशिला लावत आहेत. 

राज्य शासनातील कर्मचारी- अधिकारी यांच्या बदल्या किंवा प्रतिनियुक्ती खरंतर एप्रिल-मे  महिन्यात करण्याचा शासन निर्णय असताना संजय काकडे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याआधीच त्यांची नवी मुंबई महापालिकेतून बदली करून, नगरपरिषद प्रशासनाचे उपायुक्त मंगेश चितळे यांची नियुक्ती नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी केली आहे. 

करोना संसर्गाच्या कालावधीत महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने केलेले कार्य आणि उपाययोजना यामुळे नवी मुंबईसह आसपासच्या शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. करोना आपत्ती काळातील नवी मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक राज्य शासनाने देखील वेळोवेळी केले आहे. 

दरम्यान ओमायक्रॉनच्या रूपात करोनाची तिसरी लाट जोर धरत असताना  राज्य शासनाने संजय काकडे यांची बिन मौसमी बदली केल्याने, आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

नवी मुंबई महापालिकेचे वार्षिक बजेट सुमारे ३ हजार कोटीच्या घरात असल्याने, या महापालिकेत प्रतिनियुक्तीवर वर्णी लावण्यासाठी मंत्रालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये नेहमीच चढाओढ दिसून येते.  त्यासाठी, साम - दाम- दंडाचा वापर सर्रासपणे केला जात असल्याची चर्चा आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

१३ जानेवारीला 'भूमिपुत्र परिषद' तर २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन