२६ हजार घरांच्या किंमती कमी करा ...शेकडो सिडको सोडतधारकांना घेऊन मनसेचा सिडको वर "इंजेक्शन मोर्चा
लवकरच घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून मनसे भरवणार चित्र प्रदर्शन. राज ठाकरे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार ... मनसेचे गजानन काळे यांची घोषणा
नवी मुंबई : सिडको ने २६ हजार महाग घरांच्या किंमती कराव्या म्हणून हजारो सिडको सोडतधारकांनी आज मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील सिडको भवन वर भव्य इंजेक्शन मोर्चा काढला.
२ एप्रिल रोजी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, गणेश देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेत घरांच्या किंमती कमी करण्याबाबत नकारात्मक होते. त्यामुळे सिडको सोडतधारक मोठ्या प्रमाणात नाराज होते. सिडकोच्या या अडेलतट्टू वागण्याच्या विरोधात मनसेच्या नेतृत्वाखाली सिडको सोडतधारकांनी राज्य सरकार व सिडको प्रशासनाविरुद्ध आज एल्गार पुकारला. हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष हे स्वतःच्या कुटुंबासह रखरखत्या उन्हात मोर्चात सहभागी होते. मोर्चा मधील सहभागी नागरिकांनी हातात इंजेक्शन घेऊन सिडको प्रशासनाला इंजेक्शन द्यायची गरज आहे असे मत मांडले. आता तर इंजेक्शन ची सुई टोचून आम्ही सिडकोला जागरूक करत आहोत. पण सिडकोचे धोरण असेच राहिले तर यापुढे आंदोलनाचा पवित्रा तीव्र असेल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला.
परवडणाऱ्या घराची जाहिरात काढून अत्यंत महाग घरे विक्रीसाठी काढून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याची भावना मोर्चा मध्ये दिसून आली. बेलापूर येथील भूमिराज टॉवर, सेक्टर-३० येथे सुरू झालेला मोर्चा सिडको भवन च्या दिशेने गेला. पोलिसांनी मोर्चा सिडको भवन येथील सिग्नल वर अडवला व तो मोर्चा अर्बन हाट येथे नेण्यात आला.
प्रशासनाचा निषेध करत सिडको सोडतधारकांनी एक छोटे घर बांधले होते. मोर्चा च्या ठिकाणी महिलांनी चूल मांडून तिथेच जेवण करायला सुरुवात केली. सिडको जर आम्हाला परवडणारे घर देत नाही तर आम्ही इथेच घर बांधून राहतो असा पवित्रा मोर्चातील महिलांनी घेतला होता. सिडको प्रशासनाचा बराच वेळ कोणताही प्रतिसाद येत नसल्याने सिडको सोडतधारक आक्रमक झाले होते. सकाळी १० वाजता उन्हात सुरू झालेला मोर्चा २ वाजले तरी सिडको प्रशासन ढिम्म असल्याचे पाहून गजानन काळे यांनी सोडत धारकांना "जेल भरो" आंदोलन करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उपस्थित हजारो सिडको सोडतधारकांनी जल्लोषात प्रतिसाद देऊन स्वतःला अटक करून घेण्याचे निश्चित केले. मनसेचा हा आक्रमक पवित्रा पाहून पोलिस व सिडको प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यानंतर बऱ्याच वाटाघाटी झाल्यानंतर सिडको प्रशासनाने घर निश्चित करण्यासाठी पुष्टीकरण रक्कम भरण्यासाठी २८ दिवसांची मुदतवाढ दिली. आजच्या मोर्चाचे फलित म्हणून सर्व सिडको सोडतधारकांनी हा निर्णय मान्य केला. यामुळे पुढचा लढा लढण्यासाठी अजून वेळ मिळाली. यापुढील वेळेचा सदुपयोग करून राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊन जाणार अशी घोषणा गजानन काळे यांनी केली.
त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत सिडको सोडतीमधील सिडकोने केलेल्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करण्याचा निश्चय गजानन काळे यांनी व्यक्त केला. पुढील आठवड्यात वाशी येथे सिडको समस्यांचे भव्य प्रदर्शन मनसे तर्फे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील २८८ आमदार, सर्व खासदार, मंत्री तसेच नवी मुंबईतील नगरसेवक, सिडको अधिकारी यांना निमंत्रण देणार असल्याचे गजानन काळे यांनी घोषित केले.
मनसेच्या या मोर्चात महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, अमोल आयवळे, शाम ढमाले, सागर विचारे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, विभाग सचिव अक्षय कदम, उपविभाग अध्यक्ष राजेंद्र खाडे, महिला सेना विभाग अध्यक्ष नंदा मोरे, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक व हजारोंच्या संख्येने सिडको सोडतधारक उपस्थित होते.