आगीमुळे नेरुळ एमआयडीसीतील शुभदा पॉलिमर्स कंपनी जळून खाक
नवी मुंबई : नेरुळ मधील शिरवणे एमआयडीसीतील शुभदा पॉलिमर्स प्रोडक्टस प्रा.लि. या कंपनीमध्ये शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. कंपनीतील केमिकलमुळे ही आग शनिवारी दुपारपर्यंत तब्बल 16 तास धुमसत होती. या कालावधीत एमआयडीसी व महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत, शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी या आगीमध्ये सदर कंपनीचे तीन्ही मजले पुर्णपणे जळुन खाक झाले आहे.
शिरवणे एमआयडीसीमधील प्लॉट न. डी 506 वरील शुभदा पॉलिमर्स प्रोडक्टस प्रा.लि. या कंपनीत शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी कंपनीतील कामगारांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने ते बचावले. इलेक्ट्रीक वायरवर कोटींग करण्यासाठी लागणारे पॉलिस्टर रेक्झीन हे केमिकल कंपनीत मोठया प्रमाणात ठेवण्यात आल्याने या केमिकलने तत्काळ पेट घेतला. त्यामुळे ही आग काही वेळात सर्वत्र पसरली. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन केंद्राच्या जवांनानी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे प्रमाण जास्त असल्याने अखेर त्याठिकाणी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर महापालिका व एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 ते 12 टँकरच्या सहाय्याने येथील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र कंपनीमध्ये मोठया प्रमाणावर केमिकल असल्याने आग धुमसत असल्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवांनानी रात्रभर शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शनिवार दुपारपर्यंत आग धुमसत होती. अखेर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीमध्ये सदर कंपनीचे तळ अधीक तीन मजले पुर्णपणे जळून खाक झाले आहेत. मात्र तळ घरातील साहित्य सुरक्षित वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. सदरची आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत कंपनीचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले आहे. तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.