गॅस टँकरमधून बेकायदा गॅस सिलेंडर रिफिलिंग; उरण पोलिसांची छापेमारी
धोकायदायकरित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग करणाया टोळीचा शोध
उरण : उरण पोलिसांनी २३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भेंडखळ येथील एचपी पेट्रोल पंपालगत गॅस टँकरमधून नोझल आणि मशिनद्वारे बेकायदा आणि धोकादायक पध्दतीने सिलेंडर मध्ये गॅस भरण्यात येत असेलल्या ठिकाणी छापा मारुन आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी सदर टोळीतील ७ ते ८ व्यक्तींनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. त्यामुळे पोलिसांनी सदर ठिकाणावरुन एलपी गॅसने भरलेला टँकर, व्यावसायिक वापराचे ४२ रिकामे तर एलपीजी गॅसने भरलेले ९ सिलेंडर, बोलेरो पिकअप जिप, स्कुटी तसेच गॅस काढण्यासाठी वापरण्यात येत असलेले नोझल आणि मशिन तसेच इतर साहित्य असा तब्बल २०.२० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उरण मधील भेंडखळ येथील एचपी पेट्रोल पंपालगतच्या मोकळ्या जागेमध्ये काही व्यक्ती एचपी कंपनीच्या एलपीजी टँकरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या भरत असल्याचे आणि सदरचे सिलेंडर ते काळ्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती उरण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उरण पोलिसांनी २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भेंडखळ येथे धाव घेतली. यावेळी काही व्यक्ती तेथे उभ्या असलेल्या एचपी कंपनीच्या टँकरमधून नोझल आणि मशिनद्वारे धोकादायक पध्दतीने रिकाम्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरत असताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारुन त्यांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले.
त्यामुळे पोलिसांनी सदर ठिकाणावरुन गॅसने भरलेला टँकर तसेच गॅस भरण्यासाठी आणलेले ४२ रिकामे व्यावसायिक सिलेंडर आणि गॅसने भरलेले ९ व्यावसायिक सिलेंडर, त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर नेण्यासाठी वापरण्यात येत असलेला पिकअप जीप, स्कुटी तसेच सिलेंडर मधून गॅस काढण्यासाठी वापरण्यात येत असलेले नोझल, मशिन आणि इतर साहित्य असा तब्बल २०.२० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील टोळी बेकायदा आणि धोकादायक पध्दतीने भरलेले व्यावसायिक गॅस सिलेंडर काळ्या बाजारात दोन ते अडीच हजार रुपयांमध्ये विकत असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, सदर कारवाईदरम्यान पळून गेलेल्या टोळीने गॅस टँकरमधून नोझल आणि मशिनच्या सहाय्याने विनापरवाना गॅस सिलेंडर रिफिलिंग करुन स्वतःबरोबरच स्थानिक लोकांचा जीव धोक्यात घातल्याने उरण पोलिसांनी त्यांच्या विरोधात चोरीसह अत्यावश्यक वस्तू अधिनियम, जीविताला धोका निर्माण करणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.