खड्ड्यांतून प्रशासनाची नियोजनशून्यता समोर
यावर्षी पावसाळा सुरु होताच काही दिवसांतच राज्यातील महामार्ग, शहरांतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्याचे विदारक चित्र सर्वत्रच दिसत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने १८ जुलै रोजी जाहीर केलेल्या पर्यटन धोरणामध्ये कोकण विभागात पर्यटनाचे भलेमोठे इमले बांधले असले तरी कोकणात जाणारा मुंबई-गोवा महामार्ग राज्य सरकारच्या नियोजनशून्य धोरणांमुळे मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. कित्येक किलोमीटर पर्यंत खड्ड्यांत हरवलेले रस्ते, अर्धवट उड्डाणपूल, निकृष्ट दर्जाचे काँक्रीटीकरण, पावसात वाहून गेलेले रस्ते, कोसळणारे खांब या समस्यांमुळे रात्रीच काय,पण दिवसाही मुंबई-गोवा महामार्गावर जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे कोकणाला कोणी वालीच उरला नाही का, असा संतप्त प्रश्न मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे कोकणातील जनतेने उपस्थित केला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. सागरी महामार्ग, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग, अशी स्वप्ने कोकणातील नागरिकांना दाखवण्यात येत आहेत. कोकणातील पर्यटनातून कोट्यवधींच्या उलाढालीचे आडाखे बांधले जात आहेत. पण, गेल्या १६ वर्षात एक मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत सुरु करणे, खड्डेमुवत करणे राज्य सरकारला जमलेले नाही, हेच आजचे प्रावतन आहे. यावर्षी केवळ महिना-सव्वा महिना पडलेल्या पावसात तर खड्ड्यांतून प्रशासनाची नियोजनशून्यता समोर आली. पनवेल जवळील पळस्पे ते इंदापूर रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नव्याने करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले आहे. रस्त्यासोबत नव्याने बांधलेले उड्डाणपूलही खड्ड्यांत हरवले आहेत. काही ठिकाणी तर मुंबई-गोवा रस्ताच दिसेनासा झाला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ‘पेव्हर ब्लॉक' टाकण्याची शक्कल लढवली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमध्ये आदळून रोज हजारो वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य नियोजन नसल्यामुळे रस्त्यावरील पाणी आता बाजूच्या गावांमध्ये शिरू लागले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील घाटात रोज कोसळणाऱ्या दरडी सरकारी कामाच्या निष्क्रीयतेची साक्षच देत आहेत. खड्डयांचे साम्राज्य असलेल्या या महामार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास म्हणजे मृत्यूला निमंत्रण आहे. मुंबई-गोवा महामार्गावर बहुतांश ठिकाणी दिशादर्शक नाहीत. याशिवाय वाहतुक पोलिसांच मार्गदर्शनही वाहन चालकांना मिळत नाही, हिच वस्तुस्थिती आहे.अवजड वाहनांच्या वाढत्या संख्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रात्रीचा प्रवास म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे, अशीच भावना कोकणवासियांची झाली करीत आहेत. एकूणच मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असताना आवश्यक उपाययोजनांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे कोकणातील प्रवाशांचा मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास खडतर झाला आहे, हेच आजचे वास्तव आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खडतर प्रवासातून कोकणातील प्रवाशांची सुटका राज्य सरकार करणार कधी?.