सेक्रेड हार्ट स्कूलच्या १० विद्यार्थ्यांची अनोखी सागरी मोहीम

कल्याण: कल्याण मधील सेक्रेड हार्ट स्कूल, वरपच्या १० विद्यार्थ्यांनी श्रीलंका (टॉलिमंनार) ते भारत (रामेश्वरम) असे राम सेतू मार्गिकेतील ३० किलोमिटरचे सागरी अंतर ११ तास ५५ मिनिटात पोहून पार करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोेवला आहे. सागरी किनाऱ्यावरील होणारे प्रदुषण रोखण्याचे आणि मरीन लाईफ संवर्धन करणे या उद्देशाने सेक्रेड हार्ट शाळेतील या चमूने सदर अनोखी सागरी मोहीम हाती घेतली.

१३ एप्रिल रोजी रात्री १२.०५ मिनिटाने किर्र अंधारात या विद्यार्थ्यांनी श्रीलंकेच्या तलाईमांनार येथून भारतातील रामेश्वरमच्या दिशेने पाण्यात झेप घेतली. अंधाऱ्या काळोखात खवळलेला समुद्र, उंच लाटा, सोसाट्याच्या वारा या साऱ्यांची पर्वा न करता प्रशिक्षक रामचंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनखाली सदर १० विद्यार्थ्यांनी समुद्र जलतरणास सुरुवात केली. या मोहिमेत ६ मुले आणि ४ मुलींचा सहभाग होता. साधारण एक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सदर मोहीम फत्ते झाली.

जस जसे अंतर कापले जात होते, तसतसा मोहीम वीरांचा जोश वाढतच होता. साधारण ११ तास ५५ मिनिट यावेळेत मोहीम पूर्ण झाली. सर्व विद्यार्थी मोहीम फत्ते करुन भारत भूमीवर नतमस्तक झाले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने विजयोत्सव साजरा केला.

या मोहिमेसाठी सेक्रेड हार्ट स्कूलचे संचालक अलबिन अँथोनी आणि मुख्याध्यापिका वनिता राज यांनी मोलाचे सहकार्य केले. स्पोर्टस्‌ इन्चार्ज विश्वास गायकर यांनी मोहिमेचे नियोजन केले, तर काशिनाथ मोहपे यांनी मोहीम वीरांना सहकार्य केले. सदर मोहिमेत प्रशिक्षक रामचंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम म्हात्रे, रोनित म्हात्रे, निनाद पाटील, समृध्दी शेट्टी, तृप्ती गुप्ता, श्रीरंग साळुंखे, त्रिशा शेट्टी, सिध्देेश पात्रा, अभिप्रीत विचारे, अमोदिनी तोडकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

Read Previous

केबीपी कॉलेजच्या अंशुमन झिंगरानचा जलतरणमध्ये विश्वविक्रम