महापालिका क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांचा राष्ट्रीय गौरव

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांची येत्या २ आणि ३ मार्च रोजी इंदिरा गांधी स्टेडीयम, नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘आयएसबीएफ शुटींगबॉल वर्ल्ड कप-२०२४'मध्ये ‘भारतीय शुटींगबॉल संघ'चे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्यांच्यावर क्रीडाक्षेत्रासह सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

शुटींगबॉल या मान्यताप्राप्त खेळातील नामांकित खेळाडू म्हणून सुपरिचित असणारे नवी मुंबई महापालिकेचे क्रीडा अधिकारी  रेवप्पा गुरव यांनी यापूर्वी अनेक वर्ष ‘भारतीय शुटींगबॉल संघ'मध्ये प्रतिनिधित्व केले असून ‘भारतीय शुटींगबॉल संघ'चे कर्णधारपदही भूषविले आहे. नवी मुंबई महापालिकेचा शुटींगबॉल संघ बांधण्यात गुरव यांची महत्त्वाची भूमिका आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये या संघासह सहभागी होऊन अनेक राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील सांघिक पारितोषिके या संघाने तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून रेवप्पा गुरव यांनी पटकाविलेली आहेत. शुटींगबॉल खेळात पंचींग या अतिशय महत्त्वाच्या स्थानावरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून रेवप्पा गुरव यांचा नावलौकिक असून त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत उत्कृष्ट पंचर म्हणून असंख्य पारितोषिके पटकाविलेली आहेत.

अशा या लढवय्या खेळाडुची ‘भारतीय शुटींगबॉल संघ'चे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने संघातील खेळाडुंमध्येही उत्साह आलेला आहे. २ आणि ३ मार्च २०२४ रोजी नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या ‘शुटींगबॉल वर्ल्डकप-२०२४ स्पर्धा'मध्ये कॅनडा, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, युुएई, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, नेपाळ यांच्यासह यजमान भारत देशाचा संघ सहभागी होत असून ‘शुटींगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया'ने देशातील अनेक उत्तम खेळाडुंमधून रेवप्पा गुरव यांची ‘भारतीय संघ'चे प्रशिक्षक म्हणून त्यांच्यातील गुण हेरुन निवड केलेली आहे.

नवी मुंबई महापालिका क्रीडा अधिकारी म्हणून महापालिका क्षेत्रातील बाल, कुमार आणि युवा खेळाडुंना विविध स्पर्धा उपक्रमांच्या माध्यमातून अंगभूत कौशल्य सिध्द करण्याची संधी देणारे रेवप्पा गुरव आता ‘भारतीय शुटींगबॉल संघ'मध्ये विश्वचषक जिंकण्याची उमेद निर्माण करणार आहेत, त्यांची त्या दृष्टीने तयारी करुन घेणार आहेत. सदर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक पदी झालेल्या नियुक्तीबद्दल रेवप्पा गुरव यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच त्यांना आणि ‘भारतीय शुटींगबॉल संघ'ला विश्वचषक जिंकण्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत.

 

Read Previous

लीग सामन्यांव्दारे पालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी