‘नमो खारघर मॅरेथॉन' ला उदंड प्रतिसाद; १९,६०१ स्पर्धक धावले

पनवेल : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी' असे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन पार पडलेल्या ‘नमो खारघर मॅरेथॉन-२०२४' स्पर्धेत तब्बल १९,६०१ स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाचीही मॅरेथॉन उदंड केली. विशेष म्हणजे आतापर्यतची रेकॉर्डब्रेक करणारी सदर मॅरेथॉन ठरली. या स्पर्धेतील पुरुष खुला गटात मृणाल सरोदे तर महिला खुला गटात अर्चना जाधव हिने प्रथम क्रमांक किताब पटकावला.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स'चे सीईओ तथा मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ‘मॅरेथॉन'ने आतापर्यंतच्या सहभागाचे रेकॉर्ड यावेळी मोडले. खारघर, सेक्टर-१९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला १४ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘नमो खारघर मॅरेथॉन'ला स्पर्धेचे मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, सेलिब्रिटी जया जुगल परमार, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.  

सामाजिक आणि शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट, सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळ्या सामाजिक संदेशासाठी प्रसिध्द असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली. यंदाचा सहभाग सर्वात जास्त असल्याने आयोजकांकडून या सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. यंदाची स्पर्धा १४ वी होती. स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ५ किमी अंतर तसेच खारघर दौड गट ३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड २ किलोमीटर अशा गटात मॅरेथॉन झाली. विजेत्या स्पर्धकांना रक्कम स्वरुपात तसेच मेडल, सर्टीफिकेट, आदि बक्षिसे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

‘मॅरेथॉन'साठी आयोजन, स्वागत, प्रसिध्दी, मार्ग नियोजन, प्रवेशिका देणे-घेणे, पंच-नियमावली, फिडींग-स्पंजिंंग, साहित्य, नियंत्रण, मार्ग आखणी, प्रथमोपचार, स्वयंसेवक, बक्षिस वितरण अशा विविध समित्या कार्यरत होत्या. त्याचबरोबर ‘मॅरेथॉन'च्या निमित्ताने विविध प्री-इवेंट स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. या ‘मॅरेथॉन'मध्ये विविध सामाजिक हिताचे संदेश देणाऱ्या शाळा, सोसायटी, संस्थांचा सहभाग लक्षवेधी होता. विशेष म्हणजे लहानग्यांपासून युवा, ज्येष्ठांचा यामध्ये सहभाग होता. त्यामध्ये ९३ वर्षाचे विजय श्रीरंग यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.

या ‘मॅरेथॉन'प्रसंगी खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, ‘खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष अमर उपाध्याय, चेअरमन ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल'च्या प्राचार्या राज अलोनी, संजय भगत, समीर कदम, युवा नेते समीर कदम, युवा मोर्चाचे सुमित झुंझारराव, अल्पसंख्याक समाजाचे नेते मन्सूर पटेल, दीपक शिंदे, रमेश खडकर, विनोद घरत, गीता चौधरी, संध्या शारबिद्रे, अजय माळी, किरण पाटील, विपुल चौटालिया, सचिन वास्कर, ॲड. इर्शाद शेख, संतोषकुमार शर्मा यांच्यासह विविध संस्था, संघटना, ‘भाजपा'चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाचे कार्यकुशल लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने आंतरराष्ट्रीय भरारी घेतली आहे. त्यांच्या दूरदृष्टी निर्णयामुळे आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे, एवढेच नाही तर जगात आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे काम त्यांनी केले आहे, त्यामुळे आज आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात 'नमो चषक' स्पर्धा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध कला-क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्या अंतर्गत झालेल्या या ‘नमो खारघर मॅरेथॉन'ला स्पर्धक आणि क्रीडा रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तसेच ‘मॅरेथॉन'साठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. -आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल.

मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. आयोजनात कसूर राहू नये यासाठी वेळोवेळी नियोजन करुन त्या अनुषंगाने आढावा घ्यावा लागतो. २००६ साली सुरु झालेल्या या ‘मॅरेथॉन'ला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे आणि यंदाही तशी नोंद झाली आहे. त्यामुळे आम्हाला आयोजनात स्फुर्ती लाभत असते. -परेश ठाकूर, स्पर्धा प्रमुख तथा चेअरमन-रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

नवी मुंबई सुपर सब-ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा संपन्न