जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत कोपरखैरणे शाळेला सर्वसाधारण विजेतेपद

शाळेच्या खेळाडुंनी पटकावले ११ सुवर्ण, १६ रौप्य, १३ कांस्य पदक

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्रीडा-सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडुंचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाला असून त्यामुळे येथील विजेत्यांना थेट विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळत असल्याने यामधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडू घडताना दिसून येत आहे.

यामध्ये विशेष म्हणजे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांतील खेळाडुंनी विविध खेळांमध्ये जिल्हास्तरावर प्राविण्य प्राप्त केलेले आहे. आजतागायत कबड्डी, खो-खो या खेळापर्यंत सिमीत असलेल्या क्रीडा प्रकारांत आता फुटबॉल, बॉक्सींग, तायक्वाँदो, कॅरम, बुध्दीबळ, रायफल शुटींग, कुस्ती अशा विविध खेळांचा समावेश झाल्याने त्यामध्ये महापालिका शाळांतील खेळाडुंनी सहभागी व्हावे यादृष्टीने क्रीडा विभागाच्या वतीने विशेष लक्ष देत सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धा २२ नोव्हेंबर रोजी सीबीडी, सेवटर-३ मधील वारकरी भवन येथे संपन्न झाली. या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षाआतील वयोगटामध्ये ४५० विद्यार्थी खेळाडुंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचा शुभारंभ क्रीडा-सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त ललिता बाबर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव उपस्थित होते. या स्पर्धाच्या आयोजनासाठी ‘तायक्वाँदो असोसिएशन'चे सर्व पदाधिकारी आणि पंचांचेही मोलाचे योगदान लाभले.

या स्पर्धेत महापालिका शाळा क्र.३६, कोपरखैरणे येथील मुला-मुलींनी सर्वाधिक पदके पटकाविली असून त्यामध्ये ११ सुवर्ण, १६ रौप्य आणि १३ कांस्य पदके पटकाविण्याची अत्यंत अभिमानास्पद कामगिरी त्यांनी केलेली आहे. यामध्ये देवयानी हिरवे, निकिता राठोड, स्वरा कांबळे, श्रेया शेलार, शेजल कंक, काजल ढाकरगे, नंदिनी चव्हाण, आयुष लिघांटे, आर्यन दिंडे, वैभव गुंजाळकर, आर्यन निकम यांनी सुवर्णपदक पटकावले. तर जानवी भारती, आदिती खबुले, तनिषा वांगडे, श्रावणी उबाळे, श्रध्दा खाटपे, दुर्वा वांगडे, सीमा राठोड, श्रावणी शेलार, करिश्मा चव्हाण, खुशी विश्वकर्मा, जयश्री जाधव, दिलशान भालेराव यांनी रौप्यपदक तसेच चैत्रा इजेरी, ममता मोहिते, साक्षी राऊत, सारिका अंभोरे, सानिका हिरवे, मनिषा राऊत, समृध्दी पाटील, चैताली मांढरे, पुनम पवार, आकाश यमकर, अरविंद पत्तार, अक्षय ढवळे, आदित्य हिरवे, अथर्व कांगणे, मानव मुलगे, बु्‌ध्दम सरवदे यांनी कांस्यपदक संपादन केले आहे.

या खेळाडुंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कामगिरीमध्ये शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, विस्तार अधिकारी सुलभा बारघरे, कोपरखैरणे शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली संख्ये, सहशिक्षक प्रशांत गाडेकर, ज्ञानेश्वर घुगे, वर्षा शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यान, नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय तायक्वाँदो स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या खेळाडुंचे अभिनंदन करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्यांना पुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत. 

 

Read Previous

नवी मुंबईतील ‘छावा प्रतिष्ठान'च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Read Next

किक बाँक्सिंग स्पर्धेत ओम पाटीलचे यश