नवी मुंबईतील गावागावात दि. बा. पाटील यांची जयंती साजरी

नवी मुंबई-:भूमिपुत्रांचे कैवारी माजी खासदार दि. बा.पाटील यांची ९६ वी जयंती नवी मुंबई ,पनवेल व उरण परिसरातील गावागावात  गुरुवारी साजरी करण्यात आली .यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा  पाटील यांचेच नाव लागले असा असा निर्धार करत प्रकल्पग्रस्तांकडून  दि. बा. पाटील यांना आदरांजली वाहिली. 

दि. बा. पाटील यांचं पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील. रायगड जिल्ह्यातील जासई इथं १९२६ साली त्यांचा जन्म झाला. 'दिबां'चे वडील बाळू पाटील हे शिक्षक होते. सोबत ते शेतीही करत. शिक्षकाच्या घरात जन्मलेल्या 'दिबां'ना शिक्षणामध्ये चांगली गती होती. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले.सामाजिक कामांची आवड असलेले दिबा लोकांसाठी लढता-लढता हळूहळू राजकारणात सक्रिय झाले. त्याकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या शेतकरी कामगार पक्षातून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि बहरली. त्यातूनच पुढं ते पनवेलचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून गेले होते. राज्य विधानसभेचं विरोधी पक्षनेते पदही त्यांनी भूषवलं होतं. लोकसभेत दोनदा त्यांनी रायगडचं प्रतिनिधित्व केलं. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची उभारणी होत असताना दि. बा. पाटील हे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले. शेतकरी व प्रकल्पग्रस्तांसाठी लढे उभारत रक्त ही सांडवले. तुरुंगवास भोगला.त्यामुळे शासनाने १२.५% योजना अंमलात आणली.

सिडकोच्या प्रकल्पांमुळं बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून दिला आणि याच दिबांच्या मातीत आज आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहत आहे. आणि त्याला दिबा पाटील यांचे नाव द्यावे म्हणून येथील स्थानिक प्रकल्प ग्रस्त आग्रही आहेत. मात्र नगरविकास खात्याने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडको मार्फत पारित करून घेतला आहे. त्यामुळे येथील प्रकल्प ग्रस्त आक्रमक झाले असून विमानतळ नामकरण साठी अनेक आंदोलने केली. मात्र शासन अजूनही निर्णय बदलत नाही.त्यामुळे आगामी २४ जानेवारीला विमानतळ कामबंद आंदोलन करण्यात येणार असून त्याची घोषणा दि बा.पटील यांच्या जयंतीदिनी करण्यात येणार आहे. आणि हा लढा असाच सुरू राहील याचा इशारा देण्यासाठी गरुवारी १३ जानेवारी रोजी नवी मुंबई ,पनवेल व उरण परिसरातील गावागावात  दि बा पाटील यांची जयंती साजरी करत दि बा पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शेकापचे माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश