बेलापूर येथे आमदार निधीतून उभारणार समाजमंदिर - आ.मंदा म्हात्रे
नवी मुंबई:- बेलापूर, दिवाळे,शाहबाज,अग्रोली,सीबीडी येथील सद्गुरू बैठक घेणाऱ्या शेकडो महिला व नागरिकांनी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची नववर्षाच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. कोरोना व ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर सद्गुरू बैठक घेण्यास बंदी असल्याने तसेच जागाही उपलब्ध नसल्याने बैठक घेण्याकरिता बेलापूर विभागात आमदार निधीमधून समाज मंदिर उभारण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आ. मंदा म्हात्रे यांनीही त्वरित जागेचा शोध घेऊन आमदार निधीमधून सुसज्ज सर्व सुविधांयुक्त असे समाज मंदिर बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे बेलापूर विभागातील शेकडो महिलांनी त्यांचे आभार मानले. यावेळी सहकार महिला मंडळाच्या अध्यक्षा कुसुम म्हात्रे, लक्ष्मी म्हात्रे, कस्तुरी पाटील, निलेश पाटील, भूषण पाटील, दिवाळे गावातील अनंत कोळी, नवनाथ कोळी, सुहास कोळी, जोत्स्ना कोळी, जयश्री कोळी, नीता कोळी, शाहबाज गावातील प्रणिता जांबरे, अंजना कोळी तसेच असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले की, कोरोना व ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर निर्बंध असले तरी सदगुरु बैठकीकरिता परवानगी नाकारली जात आहे. अशातच गेली 2 वर्षे सद्गुरू बैठक आयोजित होत नाही अशी खंत बेलापूर विभागातील ग्रामस्थ महिलांनी व्यक्त केली. बैठक घेण्याकरिता एक समाजमंदिर उभारण्यात येण्याची मागणी या शेकडो ग्रामस्थ नागरिकांनी माझ्याकडे केली. बेलापूर, दिवाळे क्षेत्रात भूखंडाचा शोध घेऊन एक सुसज्ज असे समाजमंदिर माझ्या आमदार निधीमधून उभारण्यात येणार आहे. लवकरच महापालिका आयुक्त अभिजित बांगर व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची सदरबाबत भेट घेणार असून ग्रामस्थ भक्तांकरिता एक सुसज्ज समाजमंदिराची वास्तू उभारण्यात येणार असल्याने सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे.