रेडिमेड दिवाळी !
पूर्वी ज्या प्रकारे दिवाळी श्रीमंतांच्या घरी साजरी होत असे तशी आता चाळीचाळींतूनही ती साजरी होऊ लागली आहे. कामाच्या व्यापामुळे आणि वेळेच्या अभावामुळे आताच्या पिढीला दिवाळीची सारी सिद्धता करण्यास वेळ मिळत नसेलही; मात्र रेडिमेडच्या नादात दीपावलीचा खरा आनंद आपण गमावत आहोत हे मात्र नक्की ! शहरातील धकाधकीच्या जीवनातही काही मंडळी आपली संस्कृती जोपासत आहेत, परंपरांचे पालन करत आहेत; मात्र या घरांतील कॉन्व्हेंटमध्ये, इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणारी भावी पिढी ही परंपरा पुढेही चालवतील का ? की करिअरच्या नादात आपल्या संस्कृतीला विसरतील हाही एक प्रश्न आहे.
हल्लीचा काळ झपाट्याने बदलतो आहे. कालपर्यंत संगणक, महासंगणक याला तंत्रज्ञानाच्या युगात श्रेष्ठ स्थान होते आज त्याची जागा कृत्रिम बुद्धिमत्तेने घेतली आहे. आज एआयचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला आहे, ज्यामुळे घंटोका काम मिनीटोमे होऊ लागले आहे. काळागणिक मानवाच्या राहणीमानातही बदल होत गेला.
वाहतुकीची विविध साधने आल्याने जुनी बैलगाडी, टमटम यांसारखी वाहतुकीची साधने कालबाह्य झाली. बाजारात जाऊन आवश्यक वस्तूंची खरेदीही आता हळूहळू कमी होत चालली आहे. गरजेच्या सर्व वस्तू आता ऑनलाईन ऑर्डर करून घरपोच मागवल्या जाऊ लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांत माणसाच्या पोषाखांतही कमालीचा बदल झालेला दिसून येतो. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे तर मानवाचा समाजाशीही हळूहळू संबंध तुटू लागला आहे. शहरासारख्या ठिकाणी धावपळीच्या जीवनाचा प्रभाव आता सण-उत्सव साजरे करण्यावरही होत चालला आहे.
पूर्वी दसरा सरला की दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरु होत असे. आख्खे घर झाडून त्याला रंगरंगोटी केली जात असे. घरातील बच्चे कंपनीपासून वयोवृद्धही आपापल्या परीने या मोहीमेत उत्साहाने सहभागी होत असत. साफसफाई झाली की घराघरांतून दिवाळीच्या फराळाचे सुगंध येऊ लागत. या फराळ बनवण्याच्या प्रक्रियेतही घरातील समस्त मंडळी आपापल्या परीने सहभागी होत असत. घरातील कर्त्या पुरुषाचा बोनस झालेला असायचा, मग टेलरकडे जाऊन नवीन कपडे शिवण्यासाठी माप दिले जाई. कंदिलासाठी काठ्या गोळा करून सुरीने तासून आणि मापात कापून त्यापासून आकाशकंदील बनवला जाई किंवा माळ्यावर ठेवलेला कंदिलाचा जुना सांगाडा काढून त्याला नवीन कागद लावला जाई. घरातील महिला वर्गाची रांगोळ्यांची विशेष तयारी चालू असायची. ठिपक्यांच्या रांगोळीसाठी कागदावर मापात रेषा आखून अगरबत्तीच्या साहाय्याने त्यावर छिद्रे पाडली जात. गेल्या वर्षीचे शिल्लक रंग आणि रांगोळी यांचा अंदाज घेऊन नवीन रंग खरेदी करण्याचा बेत आखला जात असे. ४ दिवसांत दारात कोणत्या ४ रांगोळ्या काढायच्या त्या वहीच्या पानावर पेन्सिलने काढून त्यामध्ये रंग कोणते भरायचे हेही निश्चित केले जात असे. बच्चे कंपनी मातीचे किल्ले बनवण्याची तयारी करत. त्यासाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव केली जात असे. आपण बनवलेला किल्ला इतरांपेक्षा अधिक उठून कसा दिसेल याची आगळी चढाओढ चालत असे.
नरक चतुर्दशीच्या पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे म्हणून त्याची तयारी आदल्या संध्याकाळपासूनच केली जात असे. घरातील गृहिणी घरीच उटणे बनवत असे. दिवाळीच्या गुलाबी थंडीत पहाटे लवकर उठून अंगाला सुगंधी तेल आणि उटणे लावून आंघोळ करण्यात आणि त्यानंतर अंगठ्याने नरकासुराचे प्रतीक म्हणून अंगठ्याने कारेटे फोडून त्याची कडुशार बी जिभेवर ठेवण्यात वेगळीच मौज असे. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीची सर वर्षभरात पुन्हा कधीच अनुभवाला येत नसे. सहामाही परीक्षा संपून बच्चे कंपनीला दिवाळीची सुट्टी लागलेली असायची. सुट्टी पडल्यावर सर्वप्रथम मुले शाळेत शिकवल्यानुसार शुभेच्छापत्र बनवायची आणि या शुभेच्छा पत्रांवर दिवाळीच्या शुभेच्छांसह आपुलकीचा संदेश लिहून ती पोस्टाने आपल्या आप्तेष्टांना आणि मित्र मंडळींना पाठवत. घरी बनवलेल्या फराळाच्या विविध पदार्थांची शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे देवाणघेवाण व्हायची. घरोघरी जाऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जात असत.
आता मात्र चित्र बदलले आहे. शहरासारख्या ठिकाणी घरातील स्त्री पुरुष दोघेही नोकरी व्यवसायानिमित्त प्रतिदिन घराबाहेर पडत असल्याने दिवाळीच्या तयारीवर आणि सण साजरा करण्यावर ऑनलाईनचा आणि रेडिमेडचा प्रभाव दिसू लागला आहे. अनेक घरांत अर्बन किंवा तत्सम कंपन्यांची माणसे बोलावून घराची साफसफाई आणि रंगरंगोटी केली जाते. दारात रांगोळी काढण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने किंवा रांगोळी काढण्याची कला अवगत करण्यासाठी कधी प्रयत्नच न केल्यामुळे रांगोळीचे स्टिकर्स लावले जातात किंवा रांगोळीसाठी तयार छापे वापरले जातात. वाढती मागणी लक्षात घेऊन रांगोळ्यांचे विविध आकाराचे छापे आता बाजारातही मोठ्या प्रमाणात मिळू लागले आहेत. कंदीलही रेडिमेड विकत आणून दारावर लावले जाऊ लागले आहेत. मातीच्या पणत्यांची जागा आता विजेच्या तोरणांनी घेतली आहे. दैनंदिन कामाच्या दगदगीत फराळ तरी केव्हा बनवणार त्यामुळे दिवाळीसाठीचा फराळही रेडिमेड विकत आणला जाऊ लागला आहे. लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेडिमेड फराळाच्या उद्योगालाही गती मिळू लागली आहे. विकत आणलेला फराळ बेताचाच असल्याने आणि तो रेडिमेड असल्याने शेजारीपाजारी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ऐन दिवाळीतही टेलर्सची दुकाने ओस पडू लागळी आहेत, रेडिमेड कपड्यांचा प्रभाव वाढल्याने सराईत टेलर्सनीसुद्धा टेलरिंग सोडून रेडिमेड कपड्यांच्या अल्ट्रेशनला सुरुवात केली आहे. भाऊ बहिणींना भाऊबीजेच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूसुद्धा त्यांना भाऊबीजेच्या आधीच मिळू लागल्या आहेत, त्यामुळे यंदा दादा ताईकडून काय भेटवस्तू मिळणार याबाबतची उत्सुकताच संपून गेली आहे. हल्ली तर किल्लेही रेडिमेड मिळू लागले आहेत. शुभेच्छापत्र रेडीमेड मिळू लागली आहेत. आता तर शुभेच्छापत्रांचा काळही संपत चालला आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले आहेत आणि त्यात व्हॉटस्अपही आहे. आता शुभेच्छांची देवाणघेवाणही व्हॉटस्अपवर होऊ लागली आहे. दिवाळीनिमित्त सुट्टी मिळते म्हणून इतर सुट्यांप्रमाणे दिवाळीलाही लोक उशिरा उठू लागले आहेत. त्यामुळे अभ्यंग स्नान तर बाजूलाच राहिले.
शहरातील लोकांचे राहणीमान उंचावल्याने पूर्वी ज्या प्रकारे दिवाळी श्रीमंतांच्या घरी साजरी होत असे तशी आता चाळीचाळींतूनही ती साजरी होऊ लागली आहे. कामाच्या व्यापामुळे आणि वेळेच्या अभावामुळे आताच्या पिढीला दिवाळीची सारी सिद्धता करण्यास वेळ मिळत नसेलही; मात्र रेडिमेडच्या नादात दीपावलीचा खरा आनंद आपण गमावत आहोत हे मात्र नक्की ! शहरातील धकाधकीच्या जीवनातही काही मंडळी आपली संस्कृती जोपासत आहेत, परंपरांचे पालन करत आहेत; मात्र या घरांतील कॉन्व्हेंटमध्ये, इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणारी भावी पिढी ही परंपरा पुढेही चालवतील का ? की करिअरच्या नादात आपल्या संस्कृतीला विसरतील हाही एक प्रश्न आहे. हिंदू धर्मियांनी आजतागायत काळानुसार आपल्या परंपरांमध्ये, चालीरीतींमध्ये बदल केलेला आहे. मात्र आपण आपल्या संस्कृतीशी जेव्हढी तडजोड करू तेव्हढे खऱ्या आनंदापासून दूर जाऊ हेही तितकेच सत्य आहे. - जगन घाणेकर