जग काय म्हणेल?
जग काय म्हणेल? या तीन शब्दांची आपल्याला विलक्षण भीती असते. ह्या जगाला सतत आपण घाबरून जगतं असतो. एखादी जराशी वेगळी कृती करण्यापूर्वी आपण विचार करतो...हे करू का नको? असं केल तर जग काय म्हणेल ? आणि हे जग कधी चांगले म्हणत नाही. नेहमी नाकं मुरडत असते, चुका काढत असते, नांव ठेवत असते.
या तथाकथित जगाला आपण भीत असतो ते जग असते तरी कसे ?...कुठे आहे हे जग?.... मुख्य म्हणजे जग या शब्दाचा अर्थ तरी काय? हा जो विश्वाचा अफाट पसारा पसरलेला आहे त्याला जग असे म्हणतात. अनेक देश, गावं, तालुके, प्रांत, गल्ल्या मिळून जे होते ते म्हणजे जग आहे. मग आपण आपल्या पुरती जर एखादी कृती केली तर ती यापैकी कुणापर्यंत जाते ? त्याचा यातल्या कुठल्या गोष्टीवर परिणाम होतो ? आपण कधी याचा विचार केलेला नसतो.
जग म्हणजे आपल्याला जे लोक ओळखतात ते लोक.. म्हणजे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींचा परिवार, व्यवसाय, नोकरी करतो तिथले आणि आपल्या आसपासचे लोकं एवढ छोटसं तर आपल जग असतं. साधीशी मनाला आवडणारी कृती करतानासुद्धा आपण सावध होतो. आपणच आपल्या मनात बागुलबुवा उभा केलेला असतो. ज्या मुठभर लोकांना आपण जग समजत असतो त्यांचा आपण सतत विचार करत असतो.
स्वतःच्याच वागण्यावर निर्बंध घालत असतो. शक्यतो चौकटीत राहायला बघत असतो. ती चौकट मोडायचे धैर्य आपण करत नाही. रस्त्यात गरम खारे दाणे विकणारा माणूस आपण बघतो. त्याचा तो खरपूस वास नाकाला यायला लागतो.. ते दाणे खावेसे वाटतात. तरीपण रस्त्यात खातं खातं गेलं तर लोक काय म्हणतील? या छोट्याशा कृतीसाठी सुद्धा आपण जगाचा विचार करतो. टपरीवरची भजी खायला जावेसे वाटते पण आपण आपले पाय तिकडे वळवत नाही .कोणी बघितलं तर काय म्हणेल? नावं ठेवली तर.....
माझ्या मैत्रिणीच्या मुलीनी आंतरजातीय विवाह ठरवला. तेव्हा मैत्रीण म्हणाली मुलगा खूप हुशार, प्रेमळ, समंजस आहे, घरचे लोक छान आहेत पण जग काय म्हणेल या विचारांच्या धसक्याने ती इतकी अस्वस्थ झाली की तिला मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागली. तिच्या नवऱ्याने लोकं बोलणार हे स्वीकारले होते आणि लोकं बोललेच त्यांनी ते मनाला लावून घेतले नाही. त्यामुळे त्यांना त्रास झाला नाही.
काही महिन्यानंतर लोकं तिचा विवाह विसरूनही गेले. मुलगी नवऱ्याबरोबर गेली वीस वर्षे मजेत आहे...म्हणजे बघा. ही तर मोठी गोष्ट झाली; पण साडीपेक्षा पंजाबी ड्रेस सुटसुटीत वाटतो; पण जगाची भीती माझ्या ओळखीतल्या अजूनही किती जणींना आहे. एक मैत्रीण मला म्हणालीसुध्दा...नको बाई लोकं काय म्हणतील?
यात्रा कंपनीबरोबर एकटीने ट्रीपला कसे जायचे? मोठ्या दुकानातून खरेदी न करता कसे बाहेर पडायचे? या प्रश्नांची मनात भीती असल्याने त्याची उत्तरे नेहमी नकारार्थीच येतात. जाऊदे मोठ्या दुकानात जाऊ नकोस.. एकटीने ट्रीपला नाही जायचं. आपलं मन आधीच उत्तर देऊन टाकतं.
हेच जग जरा दृष्टीआड झाले की आपलं आतल मन उफाळून वर येतं. ट्रीपला गेलो की आपण काडीवालं आईस्क्रीम घेऊन रस्त्यात खात खात चालतो...वर म्हणतो...इथं कोण येणार आहे मला बघायला?
म्हणजे तिथे जे कोणी बघत असतात तेच आपलं जग असते. केवळ त्यांच्या इच्छेखातर आपण आपले मन मारून जगत असतो. हे जग खरोखरच इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आपल्यावर लक्ष ठेवत असते का? त्यातूनही समजा जगाने काही म्हटले तर त्यांचे किती ऐकायचे आणि त्याला किती किंमत द्यायची हे आपण ठरवायचं असते.खूप मोठं जगावेगळं काही करायची आपल्यात हिम्मत नसते. तशी आपण करतही नाही. पण अगदी लहानसहान गोष्टी करायला का घाबरायचे?
साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हातानी डोसा खायला सुद्धा..आसपासचे लोक काय म्हणतील ? यासाठी आपण घाबरतो. काटे चमच्यांनी कसरत करत डोसा खातो. त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा हातानी मस्त खाऊन घ्यायचा.आपण असे का वागलो .. याचा दरवेळी प्रत्येकाला भेटून आपण खुलासा करू शकत नाही. सांगू शकत नाही.शंकेचं निरसन करू शकत नाही. मग या लोकांच्या म्हणण्याला का घाबरायचे? आपण आपल्या मनाला पटेल योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा.
कारण त्यावेळी त्या त्या परिस्थितीचा विचार करून आपण आपल्या विवेकबुद्धीने वागत असतो. मग यात लोकांचा संबंध येतोच कुठे?आपण प्रत्येकाचे समाधान करू शकणार नाही हे आपण पक्के लक्षात ठेवायचे असते. काही लोक मात्र या जगाची पर्वा न करता जगत असतात आपण त्यांना लांबून बघतो. घरी बसून त्यांच कौतुक करतो.
यांना कसं हे जमतं?असं म्हणतो आणि सोडून देतो. कारण तो आपला मार्ग नाही हे आपण पक्के ठरवलेले असते. हे लोक आपल्यापेक्षा वेगळे.. निराळे नसतात. पण मनाने खंबीर, कणखर, ठाम, सुदृढ विचारांचे असतात.यांच्या कृतीबद्दल कोणी काही विचारलं तर उत्तर द्यायची त्यांची तयारी असते. त्यामुळे अशा लोकांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. माझ्या ओळखीच्या एका काकांनी मला सांगितले की कोणी गरज नसताना फार चौकशी करायला लागलं की मी त्यांना सरळ म्हणतो,
तुम्ही फारच प्रश्न विचारता बुवा मग समोरचा गप्प बसतो...काकांचे हे मला फारच आवडले..
गाढवाला घेऊन जाणाऱ्या वडील आणि मुलाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकलेली असते. गोष्टीतला मतीतार्थ आपल्याला माहित असतो. यावरून कुठला बोध घ्यायचा हे पण आपल्याला कळते.पण आपण तो घेतो का? ऐकावे जनाचे करावे मनाचे हेही आपल्याला माहीत आहे पण त्याप्रमाणे आपण कृती करतो का?
या काल्पनिक जगाचं जोखड मनावरून काढून टाकून मुक्तपणे जगावं आणि जीवनाचा आनंद घ्यावा. तुमच्या अंतर्मनाला योग्य वाटेल असं वागुन तर बघा...हळुहळु त्याची सवय होईल...आपल मन आपणच कणखर बनवायच असत ..हे लक्षात ठेवायच. मगच आपल्याला या तथाकथित जगाची भीती वाटत नाही. - नीता चंद्रकांत कुलकर्णी