विमानतळाच्या उद्घाटनाने विकासाचे दार उघडले; मात्र स्थानिक जनतेच्या भावनांचा दरवाजा बंदच
गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर नवी मुंबई विमानतळाचा दरवाजा उघडला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उदघाटन झाले. हा क्षण ऐतिहासिक ठरला, गेल्या अनेक दशकांपासुन वाट पाहणाऱ्या जनतेस अभिमानाचा दिवस होता, पण या अभिमानाच्या पाठीमागे समस्त नवी मुंबई व स्थानिक भूमीपुत्रांची वेदना लपलेली होती. त्या वेदनेचा भ्रमनिरास झाला. मोदीजींनी आपल्या भाषणात नवी मुंबईचे भाग्यविधाते स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव केला; परंतु सदर विमानतळाला त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे.
आतापर्यंत विमानतळासाठी अनेक संघर्ष झाले व बाल्यामामांच्या नेतृत्वाखाली व विमानतळ कृतीसमिती व स्थानिक आगरी कोळी व इतर बहुभाषिक जनतेच्या पाठबळावर त्याची धार तीव्र होत असतानाच आपल्या चाणक्य सरकारने व सर्वपक्षीय नेत्यांना बोलावुन तीन महिन्यांची मुदत घेतली; जेणेकरून उद्धघाटनाला कोणताही अडथळा नकोे. विमानतळाचे काम अर्धवट असताना व नामकरण जाहीर झाले नसताना विमानतळाचे उदघाटन करण्याचा अट्टाहास कशासाठी ?
वास्तविक कोणतेही काम संपन्न झाल्यानंतर त्या वास्तूचे उदघाटन होते, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, मुंबई-नवी मुंबई महानगरपालिका व इतर महापालिकेत येऊ घातलेली निवडणुकीत लोकांनां उद्घाटनाचे तात्पुरते गाजर दाखवून सरकारने केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. आधाडी सरकारच्या कालावधीत माजी मुखमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी विमानतळाचा प्रस्ताव हा विधान सभा व विधानपरिषेदमध्ये त्यांस संमती घेऊन केंद्राच्या संमतीसाठी पुढे पाठविला होता. त्यामुळे अद्यापही घोडे कुठे अडले? अजून कोणत्या विभागाची संमती घ्यावयाची आहे ? दि. बा. पाटील साहेबानी आपल्या आयुष्याची अखंड हयात गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी समर्पित केली. देशात साडेबारा % विकसित जमिन प्रकल्पग्रस्तांना हा कायदा सर्वप्रथम आणून शेतकऱ्यांना न्याय दिला. अशा उतुंग व्यक्तिमत्वाचे विमानतळास नाव घोषित करण्यासाठी अजून जनतेने किती संघर्ष केल्यानंतर सरकारला जाग येईल?
नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न हे केवळ विकासाचे स्वप्न नव्हते, तर ते हजारो भूमिपुत्रांच्या संघर्षाचं, त्यागाचं व आत्मसन्मानाचं प्रतीक होतं. जमिनी गमावल्या, गावं नामशेष झाली; परंतु आधुनिक भारताच्या प्रगतीसाठी स्थानिक जनतेने त्याग केला. त्यामुळे एकाच मागणी वर्षानुवर्षे उमटत राहिला.. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचे नाव ! ही मागणी भावनिक नाही तर तर ती हक्काची आहे, त्यांचे योगदान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, हक्कांसाठी व न्यायासाठी होते, त्यामुळे या विमानतळाला त्यांचेच नाव अधिकृत जाहीर व्हावे ही मागणी रास्त आहे. आतापर्यंत अरबी समुद्रात महाराजांच्या स्मारकाचे उदघाटन झाले, ते स्मारक अद्याप कुठे आहे? शिवडी न्हावा शेवा उद्घाटन अगोदर नाव जाहीर, गोवा विमानतळ उद्घाटन अगोदर मनोहर पराीकर यांचे नाव; परंतु गेली अनेक वर्ष मागणी करूनही, अनेक आंदोलन होऊनही स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांचे नाव देण्यास एवढा उशीर व चालढकल कशासाठी ? हाच प्रश्नन आता स्थानिक जनतेस पडला आहे.
परंतु सरकारला भविष्यात जनतेसमोर नमुन दि. बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव अधिकृत जाहीर करावेच लागेल व तेव्हाच खऱ्या अर्थाने दि बा. पाटील साहेब यांच्या कार्याचे व कर्तृत्वाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. नाहीतर जनतेच्या भावनांचा प्रचंड उद्रेक होऊन सरकारला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळेच सरकारने लवकरात लवकर दि बा. पाटील साहेब यांचे नाव अधिकृत घोषित करावे हीच जनतेची मागणी आहे व ज्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकनेते दि बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी घोषणा होईल त्याच दिवशी जनतेच्या दृष्टिकोनातून या विमानतळाचे अधिकृत उदघाटन झाले असे गृहीत धरता येईल. त्यामुळे सरकारने स्थानिक जनतेच्या भावनांचा दरवाजा उघडुन दि बा. पाटील साहेब यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा यथोच्या सन्मान करून त्यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करावे हीच समस्त जनतेची भावना व मागणी आहे. नवी मुंबईचे भाग्यविधाते दि. बा. पाटील साहेब हे नाव भूमिपुत्रांच्या हृदयात व मनात कायम अजरामर राहणार. - दिनेश तुरे