बोगस ‘डॉक्टरेट' पासून सावध रहा!
कुठलेली खरेखुरे विद्यापीठ हे ऑनररी डॉक्टरेट साठी एक पैसाही घेत नाही. कारण ती पदवी ही सन्मान म्हणून देण्यात आलेली असते. बोगस डॉक्टरेट, ऑनररी डॉक्टरेट ह्या पदव्या सरळ सरळ लाखो रुपये घेऊन देण्यात आलेल्या असतात. ह्या पदव्या देणार्या टोळ्या परदेशातीलच असतात काय? तर असेही नाही! या कारस्थानात अनेक स्थानिकही सामील असतात. ही पदवी देणाऱ्या महाविद्यालयाची ना कुठे पाटी दिसत, ना त्यांचे कार्यालय कुठे असते. समाजमाध्यमांवर जाहिरात करुन त्यात केवळ मोबाईल नंबर देऊन अनेक गाफील गिऱ्हाईकांना पैसे घेऊन भुलवण्यासाठी हा सापळा लावलेला असतो व अनेकजण त्यात अलगद सापडतात.
मागच्या वर्षी मी एक लेख लिहिला होता, तो म्हणजे ‘असले पुरस्कार नको रे बाप्पा !' त्याचे कारण म्हणजे, समाज माध्यमांचा गैरवापर करून खोटी प्रतिष्ठा, प्रसिध्दी मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडून काही हजार रुपये घेऊन हे पुरस्कार सरळसरळ विकण्यात आलेले असतात .तथाकथित पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्या पुरस्कारासह छायाचित्रे काढून घेऊन, त्या सोबत स्वतःची माहिती देऊन प्रसार माध्यमे, समाजमाध्यमे यात ती प्रसिद्ध करून खोटी प्रतिष्ठा आणि खोटा मोठेपणा मिरवित राहतात. अजाण नागरिक या सर्व बोगस बाबींना भुलून पुरस्कार प्राप्त व्यक्तींना कधी समक्ष भेटून, फोन करून, फेस बुक, व्हॉट्स ॲपवर भरभरून शुभेच्छा देत राहतात.
असेच गैर प्रकार तथाकथित‘डॉक्टरेट‘ऑनररी डॉक्टरेट'च्या बाबतीतही होत आहेत.‘डॉक्टरेट' किंवा ‘ऑनररी डॉक्टरेट' बोगस आहे, हे ओळखण्याच्या काही महत्वाच्या पुढील बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपली आणि आपल्या मार्फत समाजाची, सरकारची आणि अन्य संबंधित व्यक्ती,संस्था यांची होणारी फसवणूक टळू शकेल. अन्यथा अशा व्यक्तिविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल होऊन अशा बोगस पदव्यांपासून मिळणारी बोगस प्रतिष्ठा मिळणे तर दूरच राहील, पण आपल्या वाडवडिलांनी आणि आपण कष्टाने कमविलेली आहे ती खरीखुरी प्रतिष्ठा धुळीस मिळू शकेल.या बाबतीत काय कायदेशीर कारवाई ला तोंड द्यावे लागू शकते,याविषयी कुणी कायदेतज्ञ,जाणकार वकील अधिक चांगला प्रकाश टाकू शकतील.
आता मिळणारी ‘डॉक्टरेट' किंवा ‘ऑनररी डॉक्टरेट' ही बोगस आहे, हे ओळखण्याच्या काही अत्यंत सोप्या बाबी आहेत.त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
१) कुठलेही खरेखुरे विद्यापीठ हे, ह्या बोगस जाहिरातींप्रमाणे समाज माध्यमातून जाहिराती देत नाही.तर ते अधिकृत वृत्तपत्रांमधूनच जाहिराती देत असतात.
२) ह्या जाहिरातीमध्ये ह्या बोगस विद्यापीठांचे पूर्ण पत्ते, लॅन्ड लाइन फोन नंबर नसतात. तर संपर्क साधण्यासाठी फक्त मोबाईल क्रमांक दिलेला असतो.
३) दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावरसुद्धा बोगस विद्यापीठांचे पूर्ण पत्ते नसतात.
४) जगातील कुठलेही विद्यापीठ हे त्यांचे पदवीदान समारंभ हे त्यांच्या पदवीदान सभागृहात किंवा पदवीदान समारंभ अतिशय भव्य स्वरूपात करावयाचा असेल तरी तो त्यांच्या प्रांगणातच आयोजित करीत असतात. अशा पदवीदान समारंभांना त्या विद्यापीठाचे कुलगुरू, विद्यापीठाने निमंत्रित केलेले, तोलामोलाचे प्रमुख पाहुणे, विविध विभागांचे प्रमुख, संबंधित विद्यार्थी, पालक असे शेकडोंच्या संख्येने उपस्थित असतात.
५) कुठलेही खरेखुरे विद्यापीठ हे ऑनररी डॉक्टरेटसाठी मुळात जाहिरातच देत नाही, तर ते स्वतःहून कुठल्या मान्यवर व्यक्तीला अशी पदवी द्यायची ते ठरवीत असते.
६) बोगस पदव्यांचे बोगस पदवीदान समारंभ हे कुठल्यातरी पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा अशाच स्वरूपाच्या सभागृहात आयोजित करण्यात येतात.
आता हे सर्व बोगसच असल्यामुळे वर उल्लेख केला आहे त्याप्रमाणे तिथे कुणी कुलगुरू,प्रमुख पाहुणे ,हजारो विद्यार्थी,त्यांचे पालक असे कुणीही उपस्थित नसते. मात्र हे बोगस विद्यापीठ ‘आंतरराष्ट्रीय' आहे हे भासविण्यासाठी एकदोन आफ्रिकन, पाश्चात्य गोरी माणसे उभी केलेली असतात.
अर्थात ती सुद्धा ह्या टोळीचा भाग असतात. काही वेळा मात्र, अशा भानगडींची काही कल्पना नसलेल्या काही भारतीय प्रतिष्ठित व्यक्तीदेखील उपस्थित राहून ,अशा बोगस पदवीदान समारंभांची प्रतिष्ठा, शान वाढवित असल्याचे दिसून येते.
७) कुठलेली खरेखुरे विद्यापीठ हे ऑनररी डॉक्टरेट साठी एक पैसाही घेत नाही. कारण ती पदवी ही सन्मान म्हणून देण्यात आलेली असते.
८) बोगस डॉक्टरेट, ऑनररी डॉक्टरेट ह्या पदव्या सरळ सरळ लाखो रुपये घेऊन देण्यात आलेल्या असतात.
९) बरं, ह्या टोळ्या परदेशातीलच असतील,तर असेही नाही! मागे मी शोध घेतला असता, अशा बोगस विद्यापीठाचा पत्ता चक्क सांगलीचा निघाला. मी स्वतः येऊन पैसे भरतो, आपला पत्ता पाठविल्यास बरे होईल, असे सांगितल्यावर त्यांनी फक्त शिवाजी चौक, सांगली इतकाच पत्ता दिला. माझ्या सांगली येथील एका मित्राला तिथे जाऊन शोध घेण्यास सांगितले असता, तास भर शोध घेऊनही त्याला हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, किंवा विद्यापीठाची साधी पाटीही कुठे दिसली नाही! मी संबंधित महिलेला फोन करून हे सांगितले तर तिने माझा फोन कट करून माझा नंबरच ब्लॉक करून टाकला.
माझ्या लक्षात आलेल्या काही बाबी मी वर नमूद केल्या आहेत. जाणकार मंडळी अधिक भर घालू शकतील.
तरी ‘बोगस डॉक्टरेट', ‘ऑनररी डॉक्टरेट' मिळविण्यापासून सावध रहा. स्वतः फसू नका आणि ह्या पदव्या स्वतःच्या नावापुढे लावून इतरांना फसवू नका, असे कळकळीने सांगावेसे वाटते. आपल्याला खरीखुरी डॉक्टरेट, खरीखुरी ऑनररी डॉक्टरेट खरोखरच खरेखुरे संशोधन करून मिळावी, समाजासाठी विशेष योगदान देऊन मिळावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
-देवेंद्र भुजबळ