श्रावण मासाचे महत्त्व
श्रावण मासाचे माहात्म्य श्रवण करण्यास योग्य आहे. त्यामुळे त्याला ‘श्रावण मास' असे म्हटले जाते. श्रावण या शब्दाची उत्पत्ती ‘श्रवण' या शब्दातून झाली आहे. ‘श्रवण' शब्दाचे २ अर्थ होतात. त्यांपैकी एक म्हणजे ‘हिंदु पंचांगातील २२ वे नक्षत्र, असा आहे आणि दुसरा अर्थ ‘श्रवण' म्हणजे ऐकणे. श्रावणात श्रवणभक्ती केल्याने सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळेच हा मास अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो.
२५ जुलैपासून श्रावण मासारंभ झाला आहे. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या चार महिन्यांच्या काळात भगवान श्री विष्णू महासागरात शेषशय्येवर योगनिद्रा घेत असल्याने सृष्टीचा भार भगवान शिव शंकरांवर पडतो. त्यामुळे या दिवसांत शिव उपासनेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. श्रावण मसाविषयी शास्त्रीय माहिती या लेखातून जाणून घेऊया.
भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या ‘श्रीमद्भगवत्गीते'तील संवादात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘मासांमध्ये' (महिन्यांमध्ये) मी ‘मार्गशीर्ष मास आहे. याचप्रमाणे शिव आणि सनतकुमार यांच्यामध्ये श्रावणमासाबद्दल पुढील आशयाचा संवाद झाल्याचे पुराणात म्हटले आहे. भोलेनाथ शिव म्हणतात
द्वादशस्वपि मासेषु श्रावणो मेऽतिवल्लभः । श्रवणार्हं यन्माहात्म्यं तेनासौ श्रवणो मतः ।।
श्रवणर्क्षं पौर्णमास्यं ततोऽपि श्रावणः स्मृतः । यस्य श्रवणमात्रेण सिद्धिदः श्रावणोऽप्यतः ।।
अर्थ : १२ मासांतील ‘श्रावण' मास मला अतिप्रिय आहे. त्याचे माहात्म्य श्रवण करण्यास योग्य आहे. त्यामुळे त्याला ‘श्रावण' मास असे म्हटले जाते. श्रावण या शब्दाची उत्पत्ती ‘श्रवण' या शब्दातून झाली आहे. ‘श्रवण' शब्दाचे २ अर्थ होतात. त्यांपैकी एक म्हणजे ‘हिंदु पंचांगातील २२ वे नक्षत्र', असा आहे आणि दुसरा अर्थ ‘श्रवण म्हणजे ऐकण'े. श्रावणात श्रवणभक्ती केल्याने सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळेच हा मास अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो.
हिंदु धर्मात पंचांगातील ५ अंगांपैकी ‘नक्षत्र' या अंगाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे हिंदु कालगणनेनुसार १२ मासांची नावे ही त्या त्या मासाच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रानुसार आहेत, उदा. चैत्र मासातील पौर्णिमेला चंद्र ‘चित्रा' नक्षत्रात असतो; म्हणून त्या मासाचे नाव ‘चैत्र' आहे. श्रावणातील पौर्णिमेला चंद्र ‘श्रवण नक्षत्रात असतो. त्यामुळे त्या मासाचे नाव ‘श्रावण' आहे. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्राचे चैतन्य आणि ऊर्जा त्या संपूर्ण मासात अधिक प्रमाणात कार्यरत असते.
शास्त्रानुरुक्तो बहुपुत्रमित्रः सत्पात्रभक्तिः विजितारिपक्षः ।
चेज्जन्मकाले श्रवणा हि यस्य प्रेमा पुराणश्रवणे प्रवीणः ।। जातकाभरण
अर्थ : श्रवण नक्षत्रावर जन्माला आलेला मनुष्य शास्त्रप्रेमी, अनेक मित्र असलेला, मुलाबाळांची आवड असणारा, विधायक कार्ये करणारा, शत्रूंवर विजय मिळवणारा, पुराणश्रवण आदींमध्ये रुची असलेला असतो.
हिंदु संस्कृतीचे निर्माते असणाऱ्या ऋषिमुनींना याचे सर्व ज्ञान होते. त्यामुळेच त्यांनी आपल्यावर उत्तम आणि उदात्त संस्कार व्हावेत आणि आपल्याला आवश्यक ते धर्मज्ञान सहजपणे मिळावे, यांसाठी श्रावण मासात अधिकाधिक ग्रंथ, कथावाचन, पारायण, व्रतवैकल्ये, दानधर्म इत्यादी करण्याचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळेच वर्षभर मांसाहार करणारे लोक श्रावण मासात मांसाहार पूर्णतः वर्ज्य करतात. बहुतेक घरांत श्री सत्यनारायणाची पूजा अगत्याने केली जाते. श्रावणात प्रत्येक वारानुसार व्रते, विशेष पूजा, उपवास इत्यादी गोष्टी स्त्रिया तर करतातच; पण बहुतेक पुरुषसुद्धा दाढी न करणे, केस न कापणे, तसेच उपवास करणे, घरात श्रीगुरुचरित्र, श्रीनवनाथ माहात्म्य, शिवलीलामृत, शिवपुराण किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथांची पारायणे इत्यादी आचारांचे पालन करतातच. त्यामुळे ‘ब्रह्मांडातील ग्रह, तारे आणि नक्षत्रे यांचे मानवी जीवन किंवा चराचर सृष्टी यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतातच, याचाच हा पुरावा आहे.' तात्पर्य काय, तर हिंदु धर्मशास्त्रातील विज्ञान समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर, ते ते घडवण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेला या ‘श्रवण नक्षत्रामुळे आणि ‘श्रावण' मासामुळे योग्य ते क्रियमाण वापरण्यासाठी भरपूर प्रमाणात बळ मिळते. (संदर्भ : सनातन डॉट ऑर्ग )
-जगन घाणेकर