अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करु नये
ठाणे : कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरँट या दोन्ही वीज कंपन्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये. तसेच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २३ जुलै रोजी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी, महावितरण कंपनी आणि टोरँट वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
ज्या बांधकामासाठी वीज पुरवठा मागितला असेल, त्या बांधकामांच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावर वीज पुरवठा करता येणार नाही. सदर अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी त्यासंदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा. केवळ अधिकृत बांधकामालाच वीज पुरवठा केला जाईल यादृष्टीने पावले उचलावीत, असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाची सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी बैठकीत दिली. यासंदर्भात २३ जुलै पासून दोन्ही कंपन्यांनी बांधकामाच्या अधिकृतपणाची खात्री केल्याशिवाय वीज पुरवठा देऊ नये, असे स्पष्ट निर्देशही दिले. ग्राहकांना त्रास होऊ नये आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा होऊ नये यादृष्टीने या परिस्थितीतून कंपन्यांनी वरिष्ठ पातळीवर मार्ग काढावा. त्यासाठी महापालिकेच्या शहर विकास विभागाचेही सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी बैठकीत केली.
विजेसाठी अर्ज केल्यानंतर किती काळात वीज पुरवठा दिला पाहिजे, यासाठी जशी मार्गदर्शक तत्वे आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देता येणार नाही, असे देखील उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे त्यासाठी तातडीने कार्यपध्दती निश्चित करावी, असेही आयुक्त राव म्हणाले.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपायुक्त (मालमत्ता कर) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी, विधी अधिकारी मकरंद काळे, ‘महावितरण'चे मुख्य अभियंता संजय पाटील, अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम, ‘टोरँट कंपनी'चे महाव्यवस्थापक (वितरण) प्रवीणचंद्र पांचाळ, सह-महाव्यवस्थापक विनय बहल, जनसंपर्क अधिकारी शशिकांत कोठेकर उपस्थित होते.