नवी मुंबईत ड्रग्ज माफियांविरुध्द धडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी ६ महिन्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करुन अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेले, गुटखा खरेदी विक्री करणारे तसेच हुक्का पार्लर चालवणारे अशा एकूण १०४६ आरोपींना अटक केली आहे. तसेच ८५९ कारवायांमध्ये सुमारे ९ कोटी ६३ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ, त्याचप्रमाणे गुटख्याचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई पोलिसांनी या कारवायांमध्ये एका  परदेशी महिलेसह ३० महिलांची देखील धरपकड केली आहे.  

नवी मुंबई शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी २ वर्षामध्ये नवी मुंबईत सुरु असलेली अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यामागे असलेले रॅकेट उध्वस्त करुन त्यांचे धंदे बंद केले आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तसेच आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांनी ६ महिन्यामध्ये अंमली पदार्थाशी संबंधित एकूण ६३७ कारवाया करुन ७१८ आरोपींना अटक केली आहे. यात अंमली पदार्थ बाळगणारे ८० तर अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ६९१ आरोपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात ५ परदेशी महिलांसह २२ महिलांचा समावेश आहे. तसेच ५ परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे.  

या कारवाईत तब्बल ९ कोटी १० लाख १० हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत ३ कोटी ६८ लाख ३९ हजार रुपये किंमतीचे (१ किलो ५१३.१७३ ग्रॅम) एमडी (मेफेड्रॉन), ४ कोटी १८ हजार रुपये किंमतीचा (१४२ किलो ३९९.१५७ ग्रॅम) गांजा, ८४ लाख ४४०० रुपये किंमतीचे (२०२.२२४ ग्रॅम) कोकेन, ५४ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे (१७२.८ ग्रॅम) हेरॉईन, २८ हजार रुपये किंमतीचे (१४ ग्रॅम) चरस, ३९ हजार रुपये किंमतीचे (७.१३ ग्रॅम) ब्राऊन शुगर, २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे (११.३२ ग्रॅम) एमडीएमए एक्सटेसी आणि इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.  

शहरातील अंमली पदार्थाचे रॅकेट उध्वस्त करुन त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आणि त्याचे सेवन करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल नवी मुंबईतील शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि उपक्रम देखील नियमित राबविण्यात येत आहेत. अंमली पदार्थांसंदर्भात नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाला अथवा स्थानिक पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी, सदर माहितीच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल.
- संदीप निगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-अंमली पदार्थ विरोधी कक्ष. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघरमध्ये चायनीजचे दुकान जळून खाक