नेरुळ वसाहतीत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
नवी मुंबई : नेरुळ उपनगरातील सेक्टर ९ मधील एन एल टू टाईप च्या वसाहतीत श्रीराम नवमी सार्वजनिक उत्सव समितीच्या विद्यमाने श्रीराम जन्मोत्सवी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. भजन, राम जन्मोत्सव सोहळा, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सत्यनारायणाची महापूजा, लहान मुलांच्या व मुलींच्या विविध स्पर्धा आदि उपक्रम आयोजित करुन हा उत्सव पार पडला. नागरिकांनी व मुलांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात भाग घेतला होता. माजी नगरसेविका श्रीमती मीरा पाटील, श्रीमती शिल्पा कांबळी, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, सुरेश शेट्टी तसेच अनेक मान्यवरांनी सहयोग देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
गेली २१ वर्षे सातत्याने साजरा होत असलेल्या या उत्सवात नेरुळ वसाहतीत सेक्टर ९ मध्ये मोठी रथयात्रा काढण्यात आली. रथामध्ये लहान मुलांनी वेशभूषा करुन राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांची भूमिका रेखाटली होती. बहुसंख्य महिलांनी डोक्यावर कलश घेऊन या रथयात्रेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. प्रसंगी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. उत्सव समितीचे अध्यक्ष विजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा दिवसभरातील सोहळा अशोक मते, शरद भाट, दर्शन (भाऊ) आंग्रे, भूषण पाटील, मोहन सरगर, सचिन ढवळे, रवी सरगर, अजिंक्य सूर्यवंशी, रोहन गायकवाड, यशवंत गोणेवाड आदीं स्वयंसेवकांनी यासाठी अविश्रांत मेहनत घेतली.