नवी मुंबईत होलिकोत्सव साजरा
नवी मुंबई : नवी मुंबईतील शहरी आणि ग्रामीण भागात होळी आणि रंगपंचमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. विशेषतः येथील कोळी वाड्यात पारंपरिक हॉलिकोत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. गल्लोगल्लीत रंगाची उधळण होत असल्याचे पहावयास मिळाले.
नवी मुंबईत गुरुवारी होळी आणि शुक्रवारी धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. विशेष म्हणजे, या वेळी सुक्या रंगाचा अधिक वापर केला जात असल्याचे दिसत होते. यामुळे पाण्याची होणारी नासाडी काही प्रमाणात कमी झाली.
नवी मुंबईतील स्थानिक आगरी-कोळी समाजाने एक गाव, एक होळी ही प्रथा जपत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. प्रत्येक गावात एकाच गावकीच्या मानाच्या होळीची विधिवत व पारंपरिक पद्धतीने पूजा केली गेली. गावातील महिलानी पारंपरिक वेषात होळीभोवती फेर धरत गाणी गायली. अशा पद्धतीने नवी मुंबईतील गावांमध्ये होळी उत्साहात साजरी करण्यात आली.
होळीच्या दहा दिवस आधी पासूनच प्रत्येक गावागावात शिमगा साजरा करण्याची प्रथा आजही नव्या पिढी कडून जोपसली जात आहे. त्यात प्रत्येक गावागावात होळी सणा च्या एक दिवस आधी सोग घेण्याची प्रथा आहे.
त्यानुसार विविध प्रकारचे सोग घेऊन वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच होळी च्या दिवशी प्रत्येक गावात महिला, पुरुष तसेच तरुण तरुणाई होळी भोंवती फेर धरून पारंपरिक गाणी गाऊन शिमगा साजरा केला. भक्तिभावनेने होळीमातेचे केलेले विधिवत पूजन. कापराच्या साह्याने होम पेटवल्यानंतर हातातील डमरू व डफ वाजवत ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’, असे ओरडत तिच्याभोवती नाचणाऱ्या बालगोपाळांनी चौकाचौकांत भव्य होळी पेटवल्या तर दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली.
-------------------------------------------
यंदा गुरुवारी होळी व शुक्रवारी धूळवंदन आल्याने मांसाहारप्रेमीची चांगलीच मजा झाली. सकाळ पासूनच चिकन मटण खरेदी साठी दुकानां बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काहींनी लांब रांगा बघून दुपारच्या जेवणासाठी मासळीचा बेत आखला.मोठ्या प्रमाणात मांसाहार खरेदी करण्यात आला
-----------------------------------------
राजकीय मंडळी सह काहीणी यंदा धूळवड फार्म हाऊस, नर्सरी याशिवाय सोसायटीच्या आवारात साजरी केली. हिंदी, मराठी तसेच कोळी गाण्यावर मस्त ठेका धरत एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात धुलिवंदन साजरे करण्यात आले.
--------------------------------------------
गावागावात होळी च्या दिवशी पारंपरिक पद्धतीने सोग घेत गावातून वधू वरांची बँड च्या तालावर वरात काढण्यात आली. तसेच विविध सोंग घेत होळी सणाची मजा लुटली. यावेळी विविध प्रकारचे पोशाख परिधान करत सोंग घेतले होते. तरुणाई तर मोठ्या जल्लोष्यात मिरवणुकीत सहभागी झाली होती.
---------------------------------------------
आज नवी मुंबई सारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात देखील कोळी बांधवांनी आपली संस्कृती टिकवली आहे. बेलापूर येथील दिवाळे, सारसोळे, नेरुळ, घणसोली, दिवा, कोळीवाडा येथील कोळी बांधवानी होळी उत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला. होळीच्या दिवशी मध्यरात्री होळीला अग्नी लावण्यात आली. पारंपरिक अग्नी दिल्यानंतर कोळी बांधवानी विविध कोळी नृत्य करत होळी भोवती फेर धरला होता. यामुळे खऱ्या अर्थाने कोळीबांधवांच्या आनंदाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले.