फेस, फेसबुक आणि ज्योतिष

डोळ्यांच्या दुखण्यानंतर बऱ्याच दिवसांनी कार्यालयात परतलो होतो. कुणीतरी सांगितलं होतं की अशावेळी मैदानातील गवतावर अनवाणी चालावं. त्यामुळे पायांच्या तळव्यांना चांगलं ॲवयुप्रेशर होतं व तेथून जाणाऱ्या नसा, रवतवाहिन्यांमुळे डोळ्यांना आराम मिळतो. त्यामुळे मी आमच्या कार्यालयाजवळ असलेल्या ईन ऑर्बिट मॉलनजिक असलेल्या बगीच्यामधल्या गवतावर चालत होतो. तिथे मी पाहिले की काही कॉलेज तरुण-तरुणींचे थवेही जमले होते. त्यांच्यातील काही जोड्यांत सलज्ज (किंवा निर्लज्ज) शारीरीक लगट सुरु होती. भिक्षेकऱ्यांचे एक कुटुंब तिथे बसलेल्या लोकांना कोपराने ढोसून पैसे, पाण्याची बाटली असे काहीतरी द्या म्हणून विनवीत होते. आरोग्याबाबत मला कुणीतरी सुचवलेले व बिनखर्चाचे (व कसलेच साईड इफेवटस्‌ नसलेले!) उपचार कुणी सुचवले तर ते मी करतोच! त्या बगीच्यातील गवतावर चालून झाल्यावर मी कार्यालयात परतत होतो. तेवढ्यात कुणीतरी मला कोपराने ढोसले. मी मागे वळून पाहिले तर साधारण पन्नाशीचे एक गृहस्थ होते.

‘तुम्ही राजेंद्र घरत ना?' त्यांनी प्रश्न केला.

‘हो.' - मी.

‘तुम्ही दोन महिन्यांपूर्वी डोळ्यांच्या दुखण्यामुळे आजारी होतात ना?'

‘हो.' - मी.

‘तुम्हाला जून महिन्यात शिवतुतारी प्रतिष्ठानने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं हे खरंय की नाही?'

‘हो.' - मी.

   आता एका शब्दात उत्तरं द्यायचा मला कंटाळा येऊ लागला होता व तो जे सांगत होता ते  मला ओळखणारं कुणीही सांगू शकणार होतं. मग आता प्रश्न विचारण्याची वेळ माझी होती.

‘तुम्ही कोण? आणि अचानक मला गाठून हे खासगी प्रश्न कशासाठी?'

‘अहो तसं काय नाय. मला थोडं मागचं समजतं व थोडं पुढचंही समजतं म्हणून आपलं सहज तु्‌म्हाला विचारलं एवढंच !'

‘अहो मागचं मागचं काय करताय? मी पत्रकार आहे. माझ्या व अवतीभवतीच्या संपर्कात येणाऱ्यांच्या आयुष्यातल्या अनेक घडामोडींवर मी लिहित असतो. अनेक लोक ते वाचत असतात. शिवाय फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवरही भरपूर पोस्ट्‌स मी केल्या आहेत, त्यातून माहिती घेऊनही कुणी सांगू शकतं. ते सांगण्यासाठी माझीच निवड का?'

   या माझ्या प्रश्नावर तो थोडा वरमल्यासारखा झाला. म्हणाला...‘मी समाजमाध्यमं पाहात नाही. माझं फारसं वाचनही नाही; पण माझे कुटुंबिय नेहमी सांगतात की मला फेसेस-चेहरे वाचण्याची कला अवगत आहे. लोकांचे चेहरे बघून मला भूत, भविष्याचा बऱ्यापैकी मागोवा घेता येतो. अनेकांच्या बाबतीत मी सांगितलेल्या त्यांच्या मागील जीवनातल्या गोष्टी जवळपास खऱ्या ठरल्या आहेत. पण मी त्याचा धंदा मांडला नाही. कुणाकडून मी त्यासाठी कधी पाच पैसेही घेतले नाहीत.

    त्याचे भूत, भविष्य खरे की खोटे ही वेगळी बाब. पण त्याच्या बोलण्यात नम्रपणा जाणवत होता. शिवाय तो त्यासाठी पैसे, दक्षिणा वगैरे मागत नव्हता की नवस, काेंबडे, बकरे, कर्मकांड, कसलेमसले विधी वगैरेही करायला सांगत नव्हता. विशेष म्हणजे मीही त्याच्याकडे ‘माझ्याबद्दल काही सांग' म्हणून गेलो नव्हतो. म्हणजे इथे कोणताही व्यवहार, फसवणुक हाही प्रकार नव्हता. अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि ज्योतिषवाले या दोन्ही टोकांशी आम्हा पत्रकारांना संपर्क ठेवावे लागतात. त्यात आमचे व्यक्तीगत नफा, नुकसान असे काहीच नसते. दैनंदिन जीवन संघर्षामध्ये विविध प्रकारच्या बातम्या, वृत्त, घटना, त्यातील रोचकता, परस्परविरोध, नाट्यमयता, बातमीमूल्य, त्या वृत्ताचा वाचक-दर्शकांवरील परिणाम बघून ते पडताळून घेण्याची सवय आम्हाला असल्याने कुणीतरी सांगितले आणि आम्ही लगेच विश्वास ठेवला असे करुन जमत नसते. तसे पाहिले तर ‘अंधश्रध्दा निर्मुलन'वाल्या श्याम मानव यांनाही ज्योतिष सांगण्याची कला अवगत आहे म्हणे! तिच्या आधारे तेही भरपूर कमाई करु शकले असते. पण त्यांनी प्रबोधनाचा वसा घेतला व अंधश्रध्दा निर्मुलनाच्या संघर्षाच्या वाटेवर ते चालत राहिले असेही मी ऐकून होतो. थोडे मनोरंजन, थोडा अंदाज, थोडे समोरच्याला चुचकारणे, त्याच्याबद्दल चांगले बोलणे व ‘त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्याला सारे कसे लुटायला बसलेत' हे केंद्रस्थानी ठेवत ठोकताळे मांडता आले की कुणाचेही भविष्य सांगता येते असेही माझ्या कानावर आले होते.

   ‘तुमचे विविध सत्कार, प्रसिध्दी, पुरस्कार यामुळे तुमच्यावर जळणाऱ्या व तुमच्या अवतीभवती वावरणाऱ्याची नजर लागल्याने तुम्हाला काही आजारपणांचा मुकाबला करावा लागत आहे...' त्या माणसाच्या  बोलण्याने माझी विचारशृंखला तुटली व मी भानावर आलो. आता खरेतर हेही एक जनरल ठेवून देण्यासारखे वाक्य होते. अशी नजरबिजर लागून कुणाला काही होत नसते. व्याधी, दुखणी, विकार, आजार हे साऱ्याच वयोगटातील व्यक्तींना केंव्हाही होत असतात. अगदी काही ठिकाणी तर मातेच्या गर्भात असणाऱ्या बाळालाही काही आजार असतात. त्याच्यावर कोण बरे जळते? त्याने काय काम केलेले असते? त्यामुळे त्याचा हा मुद्दा मला अजिबातच पटला नाही.

‘तुमची अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीत अठ्ठावीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तुम्ही घेतलेल्या विविध मुलाखतींची संख्या अठराशेहुन अधिक आहे, हे तरी खरे ना?' त्याने पुढचे वाक्य टाकले. यावर मी म्हणालो की ‘यातील बराच भाग माझ्या बायोडाटामध्ये आहे आणि फेसबुक व अन्य समाजमाध्यमांवर व छापून आलेल्या अनेक बातम्यांमध्ये तसा उल्लेखही होत गेलेला आहे. यात तुम्ही नवे काय सांगताय?'

   ‘तुम्ही लंडन पिल्सनर कंपनीत काम केले, स्व-मालकीचे साप्ताहिक चालवले, भरपूर भटकंती करत असता हे तरी खरे की नाही?' तो विचारता झाला. मी म्हटले ‘पुन्हा तेच! या सगळ्या अनेकांना माहित असलेल्याच गोष्टी आहेत. मला ओळखणारे, माझ्यासोबत वावरणारे अनेकजण हे सगळेच जाणून आहेत. या सगळ्यावर मी भरपूर लिखाण केले असून त्यालाही व्यापक प्रसिध्दी मिळाली आहे. हे सगळे मागचे, भूतकाळातले झाले..ज्याची माहिती खूप लोकांना असणे अगदीच स्वाभाविक आहे.' यावर अजिबातच नाऊमेद न होता तो पुढे म्हणाला की ‘भविष्य सांगणाऱ्या एका केरळी ज्योतिष्याने ताडपत्रावरील माहितीच्या आधारे तुम्हाला तुमचे नाव राजेंद्र घरत असे लिहीण्याऐवजी जी. राजेंद्र असे लिहीण्याचा सल्ला दिला होता ना? त्यामुळे नेम ॲण्ड फेम विल कम टुगेदर असेही सांगितले होते की नाही?'

   त्याच्या या बोलण्यावर मी थोडा सावध झालो. फारच तपशीलवार माहिती जमवून तो एकेक पुडी सोडत होता. आता मला उलटून आक्रमण करणे भाग होते.  मी म्हणालो ‘हेही माझ्या अनेक जवळच्या मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांना ठाऊक आहे. पण त्या केरळी ज्योतिष्याचा सल्ला धुडकावून मी माझ्या मूळ नावानेच लिखाण करत राहिलो. नेम मिळाले आणि  फेमही मिळत राहिले आहे..काहीच फरक पडला नाही. ज्योतिष हे "शास्त्र" मानायला अनेकांची तयारी नाही. कारण ते प्रयोग, तर्क, वस्तुनिष्ठता, सुयोग्य निष्कर्ष या कसोट्यांतून जात नसते. अनेकदा ते समोरच्याबद्दल चांगलेचुंगलेच सांगते. आगामी काळात घडून येणारे मृत्यू, अपघात, घातपाती घटना, अप्रिय प्रसंग याबाबत ते भाकित वर्तवीत नाही. माझ्या आयुष्यातही अनेक संकटे आली. प्रियजनांचे मृत्यू, अपमृत्यु घडून आले. आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या त्याबद्दल मला भविष्य काहीच सांगत नव्हते. भारतातील काश्मिरमधल्या पहलगामवर पाकिस्तानी दहशतवादी हल्ले करुन २६ जणांचे प्राण घेतले. अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघातात २६० जणांचे प्राण गेले. तामिळनाडूच्या करुरमध्ये अभिनेता विजयच्या सभास्थानी चेंगराचेंगरी होऊन ४१ प्रेक्षकांना मरण आले आणि शंभरहुन अधिक जखमी झाले. त्याबद्दलचे भविष्य कुणीही सांगितले नव्हते. बाकीचे सारे सोडा. आता ८ ऑवटोबरला पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलवे येथे येऊन ज्या विमानतळाचे उद्‌घाटन केले त्याला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी गेली कित्येक वर्षांची असताना व राज्य मंत्रिमंडळाने केवळ एकच व ‘दिबां'च्याच नावाचा प्रस्ताव पाठवला असताना आणखी तीन महिने "तांत्रिक" बाबी पूर्ण करण्यासाठी मुदत मागण्याचा बहाणा (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांकरिताचा टाईमपास) केला जाईल असे कोणत्यातरी ज्योतिषाने भाकित वर्तवले होते काय? त्या समारंभाच्या आमंत्रण पत्रिकेवर मुंबईत राहणारे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे नाव असेल; पण ज्या आमदाराच्या मतदारसंघात हे विमानतळ येते त्या प्रशांत ठाकूर यांचे नाव वगळले जाईल, ‘दिबां'च्या समाजाचे असणाऱ्या आमदार, खासदार, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विमानतळासाठी जागा दिलेल्या भागधारकांना-प्रकल्पग्रस्तांना-भूमिपुत्रांना कसलाच मान न देता हा कार्यक्रम पार पाडला जाईल असे भाकित एखाद्यातरी ज्योतिषाने सांगितले होते काय? पण ते प्रत्यक्षात घडले. मग आता एक गोष्ट नजीकच्या भविष्यकाळात घडेल..ज्यांनी ज्यांनी ‘दिबां'च्या नावाला छुपा विरोध  केला, नामकरणाबाबत मौन पाळले, पक्षाचा अजेंडा शिरसावंद्य मानून लोकभावनेच्या विरोधात जात मिठाची गुळणी तोंडात धरली त्यांच्यातल्या अनेकांच्या ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधल्या विविध निवडणुकांमधील जागा धोक्यात येणार, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पडून जाणार हे सांगायला कोणत्याच ज्योतिषाची गरज नाही. ते त्यांना त्यांचा समाज, मतदार लवकरच दाखवून देईल.

हे सांगून मी समोर पाहिले तोवर त्या माणसाने कलटी मारली होती. तो तेथून गायब झाला होता. खरे ऐकायची काहीजणांची  तयारी नसते हेच खरे!

राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुस्तक परिक्षण!