मानसरोवर खांदेश्वर बामणडोंगरी रेल्वे स्थानकांना अनधिकृत पार्किंगचा विळखा: प्रवासी त्रस्त

नवी मुंबई : मुंबई -पनवेल लोहमार्गावरील  मानसरोवर - खांदेश्वर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकांबाहेर करण्यात येणारी अनधिकृत वाहन पार्किग या स्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. या अनधिकृत पाकिंग करणाऱ्या वाहनचालकांवर किरकोळ कारवाई केली जाते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे.

या रेल्वे स्थानकांबाहेर सिडकोने पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. व्ही.जे. ठाकूर या ठेकेदार कंपनीला हे पे अँड पार्क चालविण्यास देण्यात आले आहे. दुचाकीसाठी बारा तासाचे पंधरा रुपये आणि चार चाकीसाठी चार तासांचे २० रुपये शुल्क येथे आकारले जाते. मात्र हे पैसे वाचविण्यासाठी या सुविधेचा वापर न करता , दुचाकी आणि चार चाकी वाहन चालक आपली वाहने रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर करित असतात. त्यामुळे रस्त्यावरील या वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढणे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. 

याबाबत पे अँड पार्कचे ठेकेदार व्ही.एम. ठाकूर यांनी सिडको प्रशासनाचे लक्ष लेखी पत्राद्वारे वेधले होते. त्याच बरोबर या वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे देखील तक्रार केली होती. रस्त्यावर हजारोंच्या संख्येने वाहने उभी केलेली असतात. कारवाई १० ते २० वाहनांचे ऑनलाईन चलन फाडण्यापलिकडे कोणतीही ठोस कारवाई होत नाही , असा आरोप प्रवासी वर्गातून केला जात आहे.

या अनधिकृत पार्किंग बंद करण्यासाठी टोइंग व्हॅनचा उपयोग करून वाहने जप्त करण्याची ठोस कारवाई नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरु लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी ३ दिवस चोख पोलीस बंदोबस्त