नाल्यातून गेलेल्या विद्युत केबल्सच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा
काँग्रेस करणार ‘मोदी सरकार'च्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल- नसीम खान
ठाणे : ‘मोदी सरकार'ने लोकसभेत महिला बिल आणलेच नव्हते. ‘भाजपा'ने घटना दुरुस्ती बिल मंजुरीसाठी मांडले होते. संसदेत बहुमत नसतानाही घटना दुरुस्ती विधेयक आणून ‘काँग्रेस'ला बदनाम करण्याचा आणि लोकशाही संपविण्याचा डाव आखला होता. वास्तविक पाहता ‘भाजपा'ला महिला आरक्षण द्यायचेच नसून महिलांच्या आडून घटना दुरुस्तीचा घाट घालण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेस देशभर आंदोलन करुन ‘मोदी सरकार'कडून वारंवार मांडल्या जाणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार असल्याची माहिती ‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटी'चे कार्यकारणी सदस्य, माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांनी पत्रकार परिषेदमध्ये दिली.
‘लोकसभा'मध्ये २०२३ साली महिला आरक्षण बिल ‘काँग्रेस'च्या पाठिंब्याने मंजूर झालेले आहे. असे असताना केवळ ‘काँग्रेस'ला महिला विरोधी ठरविण्यासाठी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव ‘मोदी सरकार'ने कसा आखला आहे, याची पोलखोल ‘काँग्रेस'चे प्रदेश उपाध्यक्ष नसीम खान यांनी पत्रकार परिषदद्वारे केली. महिला बिलाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘मोदी सरकार'चा खोटेपणा दिसून आला आहे. सतत खोटे बोलून राजकारण करणारे भाजप सरकार असून चोर दरवाजातून संविधान कमजोर करण्याचा घाट घातला होता.
सदरचा धोका ओळखून काँग्रेस आणि इतर पक्षांनी घटना दुरुस्तीचे बिल नामंजूर करीत लोकशाही वाचवली आहे. आता ‘मोदी सरकार'चा निर्णय त्यांच्या अंगलट आल्याने त्यांनी महिला आरक्षण नामंजूर झाल्याचा खोटा प्रचार सुरु केला आहे. महिला आरक्षण २०२३ मध्ये मंजूर झालेले असून आरक्षण तात्काळ लागू करावे आणि येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत महिलांना समान संधी द्यावी, अशी मागणी ‘काँग्रेस'ने यापूर्वीच केलेली आहे, असे नसीम खान म्हणाले.
डिलिमिटेशनची प्रक्रिया पूर्ण करुन त्याची अंमलबजावणी करावी. तशी प्रक्रिया न करता घटना दुरुस्तीच्या माध्यमातून सर्व अधिकार ‘मोदी सरकार'ला हवे होते; जेणेकरुन आपल्या मर्जीनुसार मतदार संघाची निर्मिती करता येईल. सदर विधयक मंजूर झाले असते तर लोकशाही धोक्यात आली असती. म्हणून ‘काँग्रेस'ने या विधेयकाला विरोध केल्याचे खान यांनी सांगितले.
महिलांवरील अत्याचार रोखण्यास अपयशी ठरलेल्या ‘भाजपा'ने केंद्रात आणि राज्यात महिलांना मंत्री केले आहे. ‘भाजपा'चे नेतेच महिलांवर अत्याचार करीत असताना ते का थांबविले जात नाहीत? असे प्रश्न उपस्थित करीत नसीम खान यांनी ‘भाजपा'च्या दुटप्पी भूमिकेवर आसूड ओढले.
याप्रसंगी ‘काँग्रेस'चे शहर अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण, ठाणे ग्रामीण अध्यक्ष चेतनसिंह पवार, आदि पदाधिकारी उपस्थित होते.