ठाणे येथे लवकरच कन्व्हेन्शन सेंटर

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात मोघरपाडा नजिक खाडीकिनारी २६० मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. कन्व्हेन्शन सेंटर, शॉपिंग मॉल, कार्यालये आदिंचा या क्षेत्रात विकास होणार आहे. यासारखे शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असे नियोजन करण्याची सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथील टाऊन पार्क, कळव्यातील यशवंत रामा साळवी तरण तलावाची नव्याने बांधणी, खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह आदि प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, माजी नगरसेवक गोपाळ लांडगे, राम रेपाळे, रमाकांत मढवी, नजीब मुल्ला तसेच जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोघरपाडा येथे २६० मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी, कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल, गोल्फ कोर्स, मॉल, कार्यालये, कला दालने असा सुमारे ८००० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी लागणारी एकूण जागा, त्यापैकी ताब्यातील जागा आदि स्थितीची माहिती बैठकीत देण्यात आली. सदर प्रकल्प आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवहार्य झाला पाहिजे. त्याप्रमाणे त्याची आखणी करावी. स्थानिक गरजा काय आहेत, याचा अभ्यास केला जावा, अशी सूचना खा. श्रीकांत शिंदे यांनी केली.

त्याचबरोबर कोलशेत येथे २२ एकर जागेवर क्रीडा संकुल, मत्स्यालय, सायन्स सेंटर, तारांगण, व्यावसायिक वापराची जागा असे टाऊन पार्क प्रस्तावित आहे. त्यासाठी ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचेही सादरीकरण सदर बैठकीत झाले. तसेच कळवा येथील यशवंत रामा साळवी तरणतलाव पूर्ण पाडून नव्याने बांधण्यात यावा. त्यात तलाव, प्रेक्षागृह, इतर खेळांच्या सुविधा आदिंची रचना केली जावी. त्याचा विस्तृत आराखडा सादर करावा. कळवा परिसरातील नागरिकांसाठी तिथे उत्तम सुविधा निर्माण झाली पाहिजे, असेही खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

सोबत खारेगांव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करुन त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. सदर भागात नाट्यगृहाची आवश्यकता असल्याने नाट्यगृह इतर सुविधा लोकांना उपयोगी ठरतील, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्याचबरोबर मोठे नाट्यगृह बांधण्यापेक्षा छोटेखानी ३००-३५० प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह बांधल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळेल, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केले.

याशिवाय मुंब्रा-बायपास ते खारेगाव टोल नाका या १.५ किलोमीटरच्या पारसिक वॉटर फ्रंट विकास कामाचाही आढावा घेण्यात आला. या कामांमध्ये प्रवेशद्वार आणि सुशोभिकरणाची काही कामे शिल्लक असून ती तातडीने करण्याचे निर्देश खासदार शिंदे यांनी दिले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

होळी सणासाठी तयार तांदूळ पापड्यांवर भिस्त?