न्यू इंदिरानगर येथील सॅटिस पुल प्रकल्पातील बाधित नागरिकांना दिलासा

ठाणे: ठाणे मधील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिस पुल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नला प्राधान्य देवून खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्यू इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ॲक्मे, खेवरा सर्कल, मानपाडा येथे पर्यायी घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. १५ एप्रिल रोजी आनंदाश्रम येथे खासदार नरेश म्हस्के, महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.
ठाणे कोपरी येथील न्यू इंदिरानगर परिसरात रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या नागरिकांना स्थानिक नगरसेविका तथा महापौर शर्मिला पिंपळोलकर, मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलासा दिला. या नागरिकांना पर्यायी घरे उपलब्ध करुन द्यावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. नरेश म्हस्के यांच्याकडे सततचा पाठपुरावा करुन प्रशासनाच्या माध्यमातून खेवरा सर्कल येथे त्यांना पर्यायी घरे उपलब्ध केली.
१५ एप्रिल रोजी टेंभीनाका आनंदाश्रम येथे खासदार म्हस्के यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात १० बाधित रहिवाशांना घराच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित रहिवाशांना महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृहनेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील  यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले. या रहिवाशांना पर्यायी घरे मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी रोहित पिंपळोलकर, रमाकांत पाटील, संतोष सातकर, विकास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे