‘सिडको'च्या खारघर मधील भूखंडाला सर्वाधिक बोली

नवी मुंबई : दिवसेंदिवस जागांचे भाव गगनाला भिडत आहेत. नवी मुंबईतही गेल्या काही वर्षांपासून ‘सिडको'च्या भूखंडांना अव्वाच्या सव्वा दर मिळत आहे. बांधकाम विकासकांनी नवी मुंबईतील सानपाडा, नेरुळ, घणसोली, ऐरोली, बेलापूर, खारघर, पनवेल, कामोठे, उलवे परिसराकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यातच नवी मुंबई विमानतळामुळे शहराला अधिकच महत्व प्राप्त झाले असल्याने नेरुळनंतर खारघर विकासकांसाठी पुढील सर्वात मोठे रिअल इस्टेट डेस्टिनेशन असल्याचे दिसून येत आहे. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘सिडको'च्या भूखंड लिलाव प्रक्रियेत खारघर, सेक्टर-६ मधील भूखंड क्र.१५ (क्षेत्रफळ ३००१.०३ चौरस मीटर) या भूखंडाला सर्वाधिक ७.३५ लाख रुपयांची विक्रमी बोली मिळाली आहे.

सदरची बोली अभिनंदन बिल्डर्सने लावली आहे. त्यामुळे खारघर मधील सदर भूखंडाची एकूण किंमत २२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ‘सिडको'च्या या लिलाव प्रक्रियेत सदर भूखंडासाठी एकूण १२ बोलीदारांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी ९ जणांनी ६ लाख रुपयांपेक्षा जास्त बोली लावल्या. पण, अभिनंदन बिल्डर्स आणि अरोरा युनिव्हर्सल रिॲलिटी एलएलपीने ७ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत लावून भूखंड आपल्याला मिळवून घेतला.

‘सिडको'तर्फे ऐरोली, द्रोणागिरी, घणसोली, खारघर, कोपरखैरणे, नेरुळ, पुष्पक आणि सानपाडा येथील विविध नोडस्‌साठी योजना क्रमांक-४५ अंतर्गत एकूण ३२ भूखंडांचा लिलाव जाहीर केला आहे. यामध्ये शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी या जमिनींसाठी उच्च दराच्या बोली लावल्या आहेत. तर दुसरीकडे शहरातील वास्तुविशारदांनी बांधकाम व्यावसायिकांनी लावलेल्या बोली अवास्तव असून एकंदरीतच त्याने घरांच्या किंमतींमध्ये वाढ होण्याचा दावा केला आहे.

भूखंडांच्या वाढलेल्या किंमतींमुळे गृहनिर्माण प्रकल्पांच्या रचनेमध्ये (डिझाईन)कोणताही फरक पडणार नाही. बांधकाम व्यावसायिक जादा दराने भूखंड खरेदी करतात आणि नंतर एकूण प्रकल्प खर्च कमी करण्यासाठी बांधकाम खर्च कमी करतात. शहरात खरा फरक तेव्हाच होईल, जहेव्हा मोठ्या उद्योगांनी याठिकाणी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. आजही बहुतेक उच्च उत्पन्‌ असणारे व्यवसाय अथवा नोकरीच्या दृष्टीने मुंबईला जातात. ते इतवया गर्दीतून नवी मुंबईला येण्याऐवजी मुंबईतच राहणे पसंत करतात.

-अमित धनवट, वास्तुविशारद, सानपाडा.

बांधकाम विकासकांनी ऑक्टोबरमध्ये उद्‌घाटन होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विक्रमी किंमत बोली लावली आहे. सदर किंमत विमानतळाच्या प्रचारामुळे वाढली आहे. शहरातील मालमत्तेच्या किमतींबद्दल विकासक उत्साही असून या ठिकाणी नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प येत आहेत आणि त्यामध्ये वाढ होत असल्याचे जाणवते.
-मनोहर श्रॉफ- मालक, शिवम डेव्हलपर्स.

जमिनीच्या किंमती गगनाला भिडत असताना, विकासक मोठ्या प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ते प्रकल्प कसे आकार घेतात, ते पूर्णपणे व्यावसायिक असोत किंवा निवासी-कम व्यावसायिक असोत किंवा निवासी प्रीमियम लक्झरी प्रकल्प असोत आणि त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, ते आपल्याला पाहावे लागेल.
-धर्मेंद्र कारिया, अध्यक्ष-एमडी चॉईस ग्रुप तथा विश्वस्त-बीएएनएम.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे आयुक्तांना साकडे