वाशी येथील विटंबित प्रतिकृतीचे भूमीकन्यांकडून शुध्दीकरण

नवी मुंबई : वाशी येथील मिनी सी शोअर चौपाटी येथील आगरी-कोळी, भंडारी, कराडी मुळ निवासी समाजाच्या प्रतिष्ठा, ओळख आणि अस्मितेचे प्रतिक असलेल्या प्रतिष्ठित स्मारक (पुतळ्याचे) शुध्दीकरण करण्यात आले. यावेळी नवी मुंबईतील भूमीकन्यांनी स्मारक दुग्धाभिषेक आणि गुलाबजलाने स्वच्छ करुन प्रतिकृतींना पारंपरिक पोशाख घातला.

याप्रसंगी नगरसेविका माधुरी सुतार, परिवहन समिती सदस्या शितल भोईर, माजी नगरसेविका वैजयंती दशरथ भगत तसेच ठाणे-बेलापूर पट्टीतील अन्य भूमिकन्या आणि पुरुष बांधव उपस्थित होते. 

या शुध्दीकरणापूर्वी आगरी-कोळी समाजाचे प्रतिक असलेल्या या स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करुन कायदेशीर कारवाई सुरु केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे समाजाच्या वतीने आभार व्यवत करणारे पत्र वाशी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) जहांगीर मुलानी यांना देण्यात आले. 

सदर घटनेमुळे जिल्हा ठाणे, रायगड, पालघर, बृहन्मुंबई आणि मुंबई उपनगर या परिसरात राहणाऱ्या आगरी, कोळी, कराडी अशा मूळनिवासी भूमीपुत्र समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे असे कृत्य पुन्हा घडल्यास भूमीपुत्रांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भावना वैजयंती भगत यांनी व्यक्त केली.

तर नवी मुंबईतील अशा प्रकारच्या सर्वच समाजाच्या प्रतिकृती या त्या-त्या समाजाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब असून त्यांचा उचित सन्मान राखला गेला पाहिजे. यासाठी नवी मुंबईतील सर्वच समाजाच्या स्मारकांजवळ सीसीटीव्ही, २४ तास सुरक्षा रक्षक आणि पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था करावी. याबाबतीत महापालिका आणि पोलीस प्रशासनाने त्यांचे संरक्षण आणि जतन करणे गरजेचे असल्याचे नगरसेविका माधुरी सुतार यांनी मागणी पत्राद्वारे म्हटले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडी रोड, आसनगांव, बदलापूर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत योजनेतून करा