मिरा-भाईंदर महापालिका प्रभाग रचनेला ‘काँग्रेस'चा आक्षेप
भाईंदर : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली वॉर्ड निहाय प्रभाग रचना २०११ साली झालेल्या जनगणनेच्या आधारानुसार असल्याने २००१ पासून लोकप्रतिनिधींची संख्या ९५ राहिली आहे आणि लोकसंख्या मात्र १५ पटीने वाढली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेला आक्षेप घेत प्रभाग रचना २०२४ च्या मतदार नोंदणी आणि लोकसंख्येच्या आधारावर करण्याची मागणी ‘काँग्रेस'चे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मुझपफर हुसैन यांनी केली आहे.
मिरा-रोड येथे एका पत्रकार परिषदेत या विषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, मिरा-भाईंदर महापालिकेने प्रसिध्द केलेली प्रभाग रचना २०११ म्हणजेच १४ वर्षांपूर्वीची जनगणनानुसार लोकसंख्या गृहीत धरुन केली आहे. सन १९९१ रोजीच्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १ लाख ७५ हजार ६०५ होती, तर लोकप्रतिनिधी ६७ आणि सन २००१ मध्ये लोकसंख्या ५ लाख २० हजार ३८८ झाल्याने लोकप्रतिनिधींची संख्या वाढून ९५ करण्यात आली होती. सन २०११ रोजीच्या जनगणनानुसार लोकसंख्या ८ लाख ९ हजार ३७८ झाली तरी लोकप्रतिनिधींची संख्या ९५ ठेवण्यात आली. सन २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते; परंतु कोव्हीडचे कारण देत पुढे ढकलण्यात आली ती अद्याप झाली नाही.
सध्या शहराची लोकसंख्या १५ लाख पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे जाहीर केलेली प्रभाग रचना चुकीच्या पध्दतीने केली गेल्याने ‘काँग्रेसे'ने राज्य निवडणूक आयोग, मुख्य सचिव नगरविकास खाते, महापालिका आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे आक्षेप नोंदवत २०२४ रोजीच्या मतदार नोंदणी आणि लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग रचना करण्याची मागणी केली आहे.