नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील रस्त्यावरील पहिल्या अपघातात तीन वाहनाचा भीषण अपघात
‘मनसे'चा वाशी वॉर्ड ऑफिसवर टाळ वाजवा मोर्चा
नवी मुंबई : वाशी बस डेपोचे उद्घाटन करुन लवकरात लवकर लोकांसाठी खुला करावा, अशी मागणी करीत मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात वाशी वॉर्ड विभाग कार्यालयावर १० ऑवटोबर रोजी मोर्चा काढण्यात आला. तसेच अनेकवेळा विविध नागरी समस्यांसंदर्भात निवेदने देऊनही प्रशासन तोडगा काढत नसल्याने ‘मनसेे'ने टाळ वाजवून वाशी विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. खराब रस्ते-पदपथ, अतिक्रमणाचा विळखा, उद्यानाची दूरवस्था, रस्त्यावर पडलेला घनकचरा अशा विविध नागरी समस्यांनी वाशी मध्ये थैमान घातले आहे. या समस्यांचा जाब विचारण्या साठी ‘मनसेे'तर्फे ‘टाळ वाजवा मोर्चा'चे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला, स्थानिक नागरिक ‘मोर्चा'मध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, वाशी विभाग अधिकारी येडवे आणि इतर सर्व संबंधित अधिकारी मोर्चेकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपस्थित होते.
वाशी बस डेपो तयार असून उद्घाटन करुन लोकार्पण करण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे गजानन काळे यांनी विभाग अधिकारी येडवे यांच्या निदर्शनास आणून दिले. बस डेपो नसल्याने नागरिकांना राज्य महामार्गावर उन्हातान्हात उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. याची योग्य दखल घेऊन प्रशासनाने लवकर उद्घाटन करावे अन्यथा मनसे डेपोचे उद्घाटन करेल, असेही यावेळी काळे यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
वाशी विभाग अंतर्गत बांधण्यात आलेले शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली असून शौचालय सांभाळण्यासाठी दिलेल्या कर्मचाऱ्यांची मुले त्या शौचालयात बसून असतात. अशी तक्रारही यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे अतिक्रमण आणि उद्यान, मैदान यांची स्वछता या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली.
सदर सर्व विषय सोडवण्याचा कालबध्द कार्यक्रम महापालिकेने ‘मनसेे'ला द्यावा आणि तात्काळ कार्यवाही करायला सुरुवात करावी. अन्यथा मनसे याहून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला.
या मोर्चात मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह शहर सचिव विलास घोणे, महिला सेनेच्या शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, उपशहर अध्यक्ष दीपाली ढऊल, सचिव यशोदा खेडूसकर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, विभाग अध्यक्ष सागर विचारे, अभिलेश दंडवते, श्याम ढमाले, विकास पाटील, अक्षय भोसले, विभाग सचिव संदेश खांबे, संजय शिर्के रोजगार विभाग शहरअध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, आनंद चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, स्थानिक नागरिक, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.