प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
दिव्यांग भिकाऱ्याचा प्रामाणिकपणा!
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे विलक्षण उदाहरण समोर आले असून, अत्यंत गरिबीत जगणाऱ्या दिव्यांग भिकाऱ्याने आपल्या नैतिकतेची श्रीमंती दाखवून दिली आहे. रस्त्यावर पडलेली ७ हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम असलेली पर्स स्वतःकडे न ठेवता, ती प्रामाणिकपणे पोलिसांना परत देऊन या व्यक्तीने समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. एका बाजुला क्षुल्लक पैशांसाठी गुन्हे घडत असताना, पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणाऱ्या या व्यक्तीच्या इमानदारीने संपूर्ण शहर भारावून गेले आहे.
अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराजवळ भीक मागून उपजीविका करणारे अनिल आभा सोनावणे दोन्ही पायांनी अपंग आहेत. २ जानेवारी रोजी पश्चिम भागातील चिंचपाडा चर्चजवळून जात असताना त्यांना रस्त्यावर बेवारस पर्स सापडली. आपल्या अपंगत्वावर मात करत सोनावणे यांनी आधी तिथे मालकाचा शोध घेतला. पण, कुणीही न मिळाल्याने त्यांनी थेट अंबरनाथ पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला असता, त्यामध्ये ७,८०० रुपये आणि बँकेची कागदपत्रे आढळली. त्या आधारे पोलिसांनी मूळ मालक संजय पवार यांना संपर्क साधून बोलावून घेतले.
आपली हरवलेली रक्कम आणि महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित परत मिळाल्याने संजय पवार यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एका गरजू आणि दिव्यांग व्यक्तीने दाखवलेल्या या तत्परतेने ते थक्क झाले. पोलीस उपनिरीक्षक पानसरे, साबले आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सदर पर्स पवार यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी कृतज्ञता म्हणून संजय पवार यांनी अनिल सोनावणे यांना १ हजार रुपयांचे बक्षीस दिले आणि त्यातून स्वतःसाठी कपडे घेण्याची विनंती केली. या घटनेमुळे अनिल सोनावणे यांच्या ‘इमानदारीची' चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे.