विमानतळ'ला ‘दिबां'चेच नाव
वाशी : ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'ला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य शासनाने एकच प्रस्ताव पाठवला असल्याने ‘विमानतळ'ला ‘दिबां'च नाव लागणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आश्व्राासित केले आहे. मात्र, नामकरणाच्या सदर प्रक्रियेस ३ महिने लागणार आहेत, अशी माहिती ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली आहे.
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'च्या नामकरणाबाबत सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती समिती आणि विविध संघटनांसोबत ३ ऑवटोबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीनंतर दशरथ पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'ला प्रकल्पग्रस्तांचे आणि भूमीपुत्रांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला गेला आहे. त्यासाठी गावागावांमध्ये बैठका, आंदोलन, मोर्चे सुरु आहेत. अशातच येत्या ८ ऑक्टोबर रोजी ‘नवी मुंबई विमानतळ'चे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, आधी नाव जाहीर करा; नंतरच उद्घाटन करा, अशी भूमिका घेऊन येथील भूमीपुत्रांनी ६ ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, विमानतळ नामकारणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑवटोबर रोजी बैठकीचे आयोजन केले होते.
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'ला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत चर्चा झाली असून त्यांनी देखील ‘दिबां'च्या नावाला हिरवा कंदील दिला आहे. मात्र, या साऱ्या प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने ‘विमानतळ'ला तीन महिन्यानंतर नाव देण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासित केल्याची माहिती दशरथ पाटील यांनी दिली आहे.