सुपर स्वच्छ नवी मुंबईचा स्वच्छ संवाद’ उपक्रम
नवी मुंबई : विविध माध्यमांचा वापर करुन सातत्याने जनजागृती करण्यात येत असते. 17 नोव्हेंबर पासून स्वच्छ भारत मिशनने जाहीर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने लोकसहभागावर भर देत व्यापक जनजागृतीही केली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर लहान वयातच स्वच्छतेचा संस्कार व्हावा जेणेकरुन नवी पिढी स्वच्छतेविषयी आग्रही राहील ही भूमिका नजरेसमोर ठेवून स्वच्छता उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभागावर भर देण्यात येत आहे.
अशाच प्रकारचा ‘सुपर स्वच्छ नवी मुंबईचा – स्वच्छ संवाद’ हा एक अभिनव उपक्रम स्वच्छता ही सेवा 2025 अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे ‘फेसबुक लाईव्ह वेबिनार’ स्वरुपात राबविण्यात आला. यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या व खाजगी अशा 70 हून अधिक शाळांमधील 35 हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व, घनकच-याचे वर्गीकरण, कच-याची सुयोग्य विल्हेवाट तसेच सोशल मिडीया आणि एआयचा योग्य वापर याविषयी सविस्तर माहिती घेतली. महापालिकेच्या मुख्यालयातील ज्ञानकेंद्र या सभागृहात संपन्न झालेल्या या उपक्रमामध्ये 200 हून अधिक विद्यार्थी व 25 हून अधिक शिक्षक प्रत्यक्ष सहभागी होते तसेच 35 हजारहून अधिक विद्यार्थी आपापल्या शाळांमधून फेसबुक लाईव्हव्दारे सहभागी होते. याप्रसंगी सभागृहामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, शिक्षण अधिकारी सुलभा बारघरे यांची उपस्थिती होती.
या वेबिनारमध्ये ओल्या कच-याचा शुभंकर (मॅस्कॉट) ‘ओलू’, सुक्या कच-याचा ‘सुकू’, घरगुती घातक कच-याचा ‘घातकू’ आणि सॅनेटरी कच-याचा ‘सानू’ या चार ॲनिमेटेड मॅस्कॉटव्दारे स्वच्छतेची व कचरा वर्गीकरणाची माहिती विद्यार्थ्यांना मजेशीर स्वरुपात व समजण्यास सोपी जाईल, अशा पध्दतीने देण्यात आली. त्याचप्रमाणे अन्नाचा कचरा, पुनर्वापरयोग्य कचरा, नाकारलेला कचरा आणि इलेक्ट्रीक कचरा याचीही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांशी ऑनलाईन थेट संवाद साधत त्यांनी वेळोवेळी विचारलेल्या शंकांचे निरसण करण्यात आले. तसेच स्वच्छतेविषयी प्रश्न विचारुन त्यांना संवादात सक्रीय सहभागी करुन घेण्यात आले.
सध्याचे युग हे अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव असणारे असून एआय म्हणजे काय याची माहिती देत ते स्वच्छतेसाठी कसे उपयोगी ठरु शकते याची माहिती सोप्या भाषेत प्रात्यक्षिकासह देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा स्वत:च्या प्रगतीसाठी योग्य वापर करावा असे आवाहन करतांनाच सोशल मिडीयाव्दारे स्वच्छतेचा प्रचार करण्याचेही सूचित करण्यात आले. विद्यार्थी हे एआय आणि सोशल मिडीया यांच्या सहयोगाने ‘स्वच्छता इन्फ्ल्युएन्सर’ बनू शकतात याविषयीही माहिती देण्यात आली व प्रोत्साहित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले एआय पोस्टर #NMMCSHS2025 या हॅशटॅगसह सोशल मिडीयावर शेअर करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.
25 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छ भारत मिशनने एक दिवस, एक साथ, एक तास हा आगळावेगळा सामुहिक श्रमदानाचा उपक्रम राबविण्याचे जाहीर केले असून त्यानुसार विद्यार्थ्यांसह प्रत्येक नागरिकाने 25 सप्टेंबर रोजी सकाळी 1 तास आपली शाळा व आपला परिसर या क्षेत्रात स्वच्छता कार्यात सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.