अंबरनाथमध्ये स्पीड ब्रेकर्सचा अतिरेक
अंबरनाथ : अंबरनाथ (पूर्व) येथील कर्जत-काटई राज्यमार्गाच्या जोडरस्त्यावर अवघ्या २०० मीटर्सच्या अंतरावर तब्बल १० स्पीड ब्रेकर्स असून त्यावर पांढरे पट्टे नसून रस्त्याच्या बाजुला सूचना फलक देखील लावण्यात आलेले नाहीत. यामुळे वाहन चालकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत असून वाहने नादुरुस्त होण्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. सदर बेकायदेशीर स्पीड ब्रेकर्स काढून टाकावे, अशी मागणी होत आहे.
अंबरनाथ (पूर्व) येथील गॅस गोडाऊन ते सीएनजी पेट्रोल पंप अत्यंत वर्दळीचा रस्ता असून पुढे ते कर्जत-काटई राज्यमार्ग आणि आनंदनगर एमआयडीसी यांना जोडला आहे. या रस्त्याच्या रॉयल पार्क ते सीएनजी पेट्रोल पंप या अंदाजे २०० मीटर्सच्या अंतरात १० स्पीड ब्रेकर्स आहेत. त्यावर पांढरे पट्टे नाहीत तसेच रस्त्याच्या बाजुला सूचना फलक देखील नाहीत. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी नेहमी अंधार असल्याने सदर स्पीड ब्रेकर्स दिसून येत नसल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत. रस्त्याच्या बाजुला म्हाडा कॉलनी आणि काही वसाहती असून एक शाळा देखील आहे. असे असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या संख्येने बेकायदेशीर स्पीड ब्रेकर्स असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
वाहतूक नियमानुसार स्पीड ब्रेकर उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेन्ट पट्ट्या, पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे. शिवाय वाहन चालकांना समजण्यासाठी ४० मीटर आधीच सूचना फलकही असणे अपेक्षित आहे. अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रंबलिंग पध्दतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा निकष आहे. गतिरोधक उभारताना या गतिरोधकांची उंची २.५० ते १० सेंटिमीटरपर्यंत, लांबी ३.५ सेंटीमीटर, वर्तुळाकार क्षेत्र १७ मीटर असायला हवे, असे नियम आहेत. सदर ठिकाणी अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर्स असावेत याबद्दल दुमत नाही; मात्र वाहतुकीच्या नियमानुसार पांढरे पट्टे, सूचना फलक असावे. अनावश्यक स्पीड ब्रेकर्स काढून टाकण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय चेरीविला यांनी केली आहे.
या संदर्भात अंबरनाथ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांना विचारले असता त्यांनी वाहतूक नियमानुसार पांढरे पट्टे, सूचना फलक लावण्यासंदर्भात लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच स्पीड ब्रेकर्सची संख्या कमी करण्याबाबत नगरपालिका प्रशासन सोबत चर्चा करुनच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.