उल्हासनगर महापौरपदी अश्विनी निकम, उपमहापौरपदी अमर लुंड निश्चित

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेतील प्रदीर्घ सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला असून, शहराच्या राजकारणात ‘महायुती'चे नवे पर्व सुरु झाले आहे. महापालिका निवडणुकीत परस्परविरोधात शड्डू ठोकणारे शिवसेना आणि भाजप सत्तेसाठी एकत्र आले असून, महापौरपद ‘शिवसेना'कडे तर उपमहापौरपद ‘भाजपा'कडे सोपवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे.

या सत्तासमीकरणानुसार ३० जानेवारी रोजी झालेल्या नामांकन प्रक्रियेत ‘शिवसेना'च्या (शिंदे गट) अश्विनी कमलेश निकम यांनी महापौर पदासाठी, तर ‘भाजपा'कडून अमर लुंड यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने ‘महायुती'ची सत्ता आता केवळ औपचारिक उरली आहे. आगामी ३ फेब्रुवारीची निवडणूक केवळ एक तांत्रिक प्रक्रिया असेल, ते आता स्पष्ट झाले आहे.

या राजकीय घडामोडींदरम्यान महापालिका मुख्यालयात मोठी लगबग पाहायला मिळाली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार कुमार आयलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महापौर पदासाठी वरिष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी आणि डिंपल ठाकूर यांची नावे चर्चेत असताना, शेवटच्या क्षणी वरिष्ठ नेतृत्वाने अश्विनी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करुन सर्वांनाच धक्का दिला. पहिल्यांदाच निवडून आलेल्या अश्विनी निकम यांना थेट शहराचे प्रथम नागरिकत्व बहाल केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. निकम या कलानी कुटुंबाच्या निकटवर्तीय मानल्या जात असून, याच राजकीय गणितामुळे ‘महायुती'चे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, उमेदवारी अर्ज भरताना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली असून, पक्षांतर्गत नाराजीची कुजबुजही ऐकू येत आहे. मात्र, ‘महायुती'कडे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधाची धार बोथट झाली आहे. महापालिकेत आता प्रभावी विरोधी पक्षच उरणार नाही, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या राजकारणातील ‘युती'चे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटल्याने उल्हासनगरच्या विकासाला नवी गती मिळते की अंतर्गत नाराजीचे सावट प्रशासनावर पडते, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘नवी मुंबई'चा महापौर कोण?