प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मंबई विमानतळावरुन विमानोड्डाण सुरु
नवी मुंबई : अखेर गेल्या अनेक वर्षांची प्रतिक्षा संपून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिल्या विमानाने २५ डिसेंबर रोजी नाताळ दिनी टेक ऑफ केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानोड्डाणास सुरुवात झाल्याने नवी मुंबईकरांनी आनंद व्यवत केला खरा; पण या विमानतळाला केंद्र आणि राज्य शासनाने लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव अद्याप न दिल्याने गावोगावी निषेधही नोंदवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. तेव्हापासून विविध चाचण्या आणि इतर सोपस्कार होऊन २५ डिसेंबर रोजी सकाळी ८.४० वाजता नवी मुंबईतून पहिल्या विमानाने हैदराबादच्या दिशेने उड्डाण केले. तत्पूर्वी नवी मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सचे बंगळुरू येथून आलेलेे पहिले विमान सकाळी ८ वाजता लॅन्ड झालेे. बंगळुरूहून आलेल्या इंडिगो विमानाचे धावपट्टीवर आगमन झाल्यावर धावपट्टीवर पाण्याचे फवारे उडवून वॉटर जेट (पाण्याच्या तोफांची) सलामी देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर इंडिगोचे हेच विमान सकाळी ८.४० वाजता हैदराबादच्या दिशेने झेपावले. या विमानोड्डाणचा ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेऱ्यात आणि मोबाईलमध्ये बंदिस्त करण्यासाठी हजारो नागरिकांची पनवेल आणि उलवे परिसरात गर्दी दिसली.
पहिल्या दिवशी नवी मुंबई ते गोवा (मोपा), कोची, बेंगळुरु, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबादसाठी इंडिगो, अकासा एअर, एअर इंडिया एवस्प्रेस, स्टार एअर या कंपन्यांनी विमानसेवा दिली. प्रांरभीच्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहणार असून, दररोज २३ नियोजित उड्डाणे सुरु राहतील. यानंतर फेब्रुवारी २०२६ पासून विमानतळ २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांनाही सुरुवात होणार आहे.
२७ गावातील ग्रामस्थांना मोफत विमान प्रवास...
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प ज्या भूमीपुत्रांच्या जागेवर जमिनीवर उभे राहिले आहे, त्या २७ गावातील भूमीपुत्रांना अदानी फाऊंडेशनच्या वतीने पहिल्या विमानातून मोफत विमान प्रवासाची सोय करण्यात आली होती. यामध्ये गावातील महिलांचाही समावेश होता.
१,५१५ ड्रोनचा ड्रोन शोने उजळले आकाश...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन २५ डिसेंबर रोजी विमान सेवा सुरु होणार असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला विमानतळ स्थळी १,५१५ ड्रोनचा नेत्रदीपक ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. समन्वयाने उडणाऱ्या या ड्रोननी आकर्षक हवाई रचनांनी आकाश उजळून टाकले, ज्यात थ्रीडी कमळाची फुले, विमानतळाचा लोगो, हरित विमानतळाची दृश्ये, मुंबईवरुन उडणारे विमान, भारताचा उदय अशी प्रतिमा आणि कमळाकृती संकल्पनेवर आधारित आकर्षक टर्मिनल रचना यांचा समावेश होता. या दृश्यांमधून संपूर्ण प्रकल्पाची दृष्टी आणि व्यापकता प्रभावीपणे मांडण्यात आली.