नेरुळच्या सिद्धी वनमाळीची राष्ट्रीय पातळीवर तिहेरी कामगिरी
नवी मुंबई : नेरुळ येथील 25 वर्षीय सिद्धी वनमाळी हिने राष्ट्रीय स्टँड-अप पॅडलिंग स्पर्धेत एकाच वेळी तीन कांस्य पदके पटकावून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेचे आयोजन सर्फिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि तामिळनाडू सरकारच्या पर्यटन विभागातर्फे तामिळनाडूतील रामनाथपुरम जिह्यातील पाल्कबे खाडी परिसरातील अरियामन बीच येथे 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले होते.
सिद्धीने 5 कि.मी. डिस्टन्स, 3 कि.मी. टेक्निकल आणि 200 मीटर स्प्रिंट या तिन्ही प्रकारांमध्ये दमदार प्रदर्शन करीत प्रत्येकी कांस्य पदक पटकावले. विशेष म्हणजे ही तिची पहिलीच राष्ट्रीय पातळीवरील स्टँड-अप पॅडलिंग स्पर्धा होती. स्पर्धेपूर्वी सिद्धीने विरारमधील मुंबई सर्फ क्लब येथे नियमित सराव करुन स्वत:ला सिद्ध केले. या क्लबकडून तिला स्पर्धेपूर्वी तसेच स्पर्धेदरम्यान सर्वतोपरी सहकार्य मिळाले.
सिद्धी वनमाळीला जलक्रीडांचे बालपणापासूनच आकर्षण आहे. शालेय व महाविद्यालयीन काळात तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळवली आहेत. या अनुभवाच्या बळावरच तिने स्टँड-अप पॅडलिंग या नव्या खेळात प्रभावी पाऊल टाकले. या तिहेरी कामगिरीमुळे सिद्धी वनमाळी ही महाराष्ट्रातील पहिली स्टँड-अप पॅडलिंग खेळाडू ठरली आहे. तिच्या या कामगिरीचे जलक्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि क्रीडा रसिकांकडून मोठया प्रमाणावर कौतुक होत आहे.