पनवेल रेल्वे स्टेशन परिसराचा श्वास कोंडतोय

नवीन पनवेल : जंक्शन होत असलेल्या पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या बेकायदेशीर झोपड्या तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवासी, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून तक्काकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर अनेक बेकायदेशीर झोपड्या उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसराचा श्वास कोंडला आहे. फुटपाथवरच अनोळखी नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसह संसार थाटल्याने पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. मात्र, पनवेल महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात अनेक मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. याच रेल्वे स्टेशन परिसरातून अनेक नागरिक कामानिमित्त हजाराेंच्या संख्येने ये-जा करत असतात. पनवेल जंक्शन रेल्वे स्टेशन होत आहे. मात्र, या स्टेशनच्या आजुबाजुच्या परिसरात बेकायदेशीर झोपड्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सदर ठिकाणी झोपड्यांमध्ये राहणारे नागरिक कुठून आले आणि कोण आहेत? याचा देखील थांगपत्ता नाही. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पनवेल महापालिका आणि पनवेल शहर पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत असताना रेल्वे स्टेशन परिसरात बकालीकरण सुरु असताना प्रशासन गप्प का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

फुटपाथवर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर झोपडपट्टीतील मुले याच ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशन समोरील सर्कल जवळ उभे असतात. त्यामुळे येण्या जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा त्यांनी प्रवाशांची वाट देखील अडवल्याच्या घटना ताज्या आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे-मुलुंड दरम्यानच्या स्थानकास आनंद दिघे यांचे नाव