दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करा - संदीप नाईक 

उपयुक्त सराव प्रश्नपत्रिका संचांचे विनामूल्य वितरण 

नवी मुंबई : सामाजिक संस्था संदीप नाईक प्रतिष्ठानच्या एसएससी बोर्डाच्या धरतीवरील सराव परीक्षेचा १६ डिसेंबर रोजी नेरूळ येथील विद्या भवन स्कूलमध्ये शुभारंभ झाला. यावेळी संदीप नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप नाईक आणि मान्यवरांच्या  शुभहस्ते याप्रसंगी दहावीच्या परीक्षेसाठी उपयुक्त  प्रश्नपत्रिका संचांचे प्रकाशन करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात या प्रश्नपत्रिका संचाचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. याप्रसंगी दहावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक अभ्यास करून आपली उत्कृष्ट कामगिरी करावी, असा सल्ला संदीप नाईक यांनी दिला.

 प्रश्नपत्रिका संच प्रकाशन आणि वितरण कार्यक्रम प्रसंगी पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कुलसचिव दिनेश मिसाळ, कदम सर, अविनाश कुलकर्णी, मनोज महाजन,  मुख्याध्यापक अशोक सोनवणे, मुख्याध्यापक रवींद्र भोईर, सुनील पाटील, मुख्याध्यापिका श्रीजा नायर, प्राचार्य प्रताप महाडिक, दत्ता घोडके सर, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावर्षी एसएससी सराव परीक्षा उपक्रमाने २७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ५४ परीक्षा केंद्र असून ९००० च्या घरामध्ये विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 

उपक्रमशीलतेसाठी मनोज महाजन यांना  आयडॉल शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग अभियानाअंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ "  मध्ये ठाणे जिल्ह्यातून  विद्याभवन प्राथमिक मराठी शाळा, नेरूळ हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे तसेच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचा क्रांती ज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार 2023- अविनाश मुरलीधर कुलकर्णी, सहाय्यक शिक्षक, विद्याभवन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नेरूळ यांना बहाल करण्यात आलेला आहे. यानिमित्त विद्या भवन स्कूल  आणि सन्मान प्राप्त या शिक्षकांचा संदीप नाईक यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदीप नाईक यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्यार्थ्यांची गरज पाहता सरावासाठी उपयुक्त असे प्रश्नपत्रिका संच विनामूल्य उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. या प्रश्नपत्रिका संचांमुळे मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. सर्वच क्षेत्रामध्ये नवी मुंबईचा विकास होत असून शिक्षण क्षेत्रातही हे शहर अव्वल असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विकासाला चालना मिळेल अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थी हा देशाचे भवितव्य आहे आणि तो प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा या हेतूने नामदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून बोर्डाच्या धरतीवरील एसएससी  सराव परीक्षेचा उपक्रम सुरू करण्यात आला. 

सर्व विषयांचा अभ्यास करा. प्रश्नपत्रिका संचामध्ये क्यू.आर. कोड   माध्यमातून प्रश्नांची उत्तरे देखील दिली आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः उत्तरांचे मूल्यांकन करता येईल, असे त्यांनी नमूद केले. सराव परीक्षा उपक्रमाच्या यशासाठी त्यांनी शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

सीवूड्सच्या टिळक स्पोर्ट्सप्लेक्समध्ये वार्षिक महोत्सवाचा समारोप