प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा
पनवेल : पनवेल तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. ‘जिल्हा परिषद'च्या ८ गटांसाठी १८ उमेदवार आणि ‘पंचायत समिती'च्या १६ गणांसाठी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे ‘जिल्हा परिषद'च्या ७ जागांवर भाजप आणि शेकापमध्ये थेट लढत होणार असून तालुक्यात ‘कमळ' आणि ‘शिट्टी' यांच्यातच खरी जुंपणार असल्याचे दिसून येत आहे.
‘जिल्हा परिषद'च्या ८ जागांसाठी सुरुवातीला ३९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत १ अर्ज बाद झाला, तर २० जणांनी आपले अर्ज मागे घ्ोतले. त्यामुळे आता १८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. ‘पंचायत समिती'च्या १६ गणांसाठी ८३ अर्ज आले होते, त्यातील २ अर्ज बाद झाले आणि ३५ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ४६ उमेदवार मैदानात आहेत. तालुक्यातील प्रत्येक गटात स्थानिक समीकरणे बदलताना दिसत आहेत. वावंजे गटात ‘शेकाप'चे वर्चस्व असले तरी ‘भाजपा'च्या कमळा देशेकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. ‘शेकाप'चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या केळवणे गटातही राजकीय गणिते बदलल्याने ‘भाजपा'ला विजयाची आशा आहे. पळस्पे गटात मात्र ‘शेकाप'ला मोठी हानी सोसावी लागली असून येथे राजकीय बाजी पलटण्याची चिन्हे आहेत.
गव्हाण गटात यंदा भाजप झेंडा फडकवू शकतो, असे चित्र आहे. मात्र, येथे ‘महाविकास आघाडी'ने ‘भाजपा'च्याच एका बंडखोर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन ‘भाजपा'ची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. वावेघर आणि वडघर गटात शेकाप आणि भाजप मधील लढत अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. नेरे गटात अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने ‘भाजपा'ची स्थिती भक्कम झाली आहे, तर पाली-देवद मतदारसंघात भाजप पुन्हा आपला विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. या निवडणुकीत ‘भाजपा'चे नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी करीत आहेत, तर ‘शेकाप'ची संपूर्ण धुरा माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या खांद्यावर आहे. ‘शेकाप'मधून ‘भाजपा'त आलेले प्रितम म्हात्रे यांच्यामुळे या निवडणुकीत ‘भाजपा'ला लाभ होणार आहे, असे दिसून येते. ‘शिवसेना शिंदे गट'ने आपले अर्ज मागे घेतल्यामुळे ‘महायुती'च्या मतांचे विभाजन टळले असून याचा मोठा राजकीय फायदा ‘भाजपा'ला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील ३ गट आणि उरण मतदारसंघातील ५ गटांमध्ये सदर निवडणूक होत असून, पळस्पे गट या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे.